पंकजा मुंडेंनी घेतला ब्रेक, दोन महिने सुटीवर जाणार

0

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांसाठी राजकारणातून ब्रेक घेतला आहे. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आला असल्याने हा ब्रेक असल्याचे मुंडे यांनी सांगितले. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना पंकजा यांनी सांगितले की, “मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही. मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?” असा सवाल उपस्थित करत “माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे” असे त्यांनी सांगितले. पंकजा यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाची चर्चा कालपासून सुरु असताना त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी भाजप सोडून कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, मी नाराज आहे आणि पक्षाच्या बाहेर जाणार असल्याची चर्चा होत असते. मी भाजपमध्येच राहणार आहे. मी राहुल आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चुकीची माहिती माध्यमांनी दाखविली असून संबंधित वृत्तवाहिनीवर मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले.