चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीकडून उमेदवारी जाहीर

0

चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडी कडून काँग्रेसच्या आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या घोषणाची चर्चा होती. मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा काँग्रेस श्रेष्ठींनी नाव बदलल्याचे दिसून येत आहे. यादीमध्ये अद्याप पर्यंत अधिकृत घोषणा झाली नसली तरी धानोरकर यांना अधिकृत तिकीट देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

या लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. मात्र, इथे पोटनिवडणूक झाली नव्हती. विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अर्ज करण्याची तारीख अंतिम टप्प्यावर असताना देखील काँग्रेसने अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही. विदर्भातील सर्व जागा वगळता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये तिकीट जाहीर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे वडेट्टीवार आणि धानोरकर दोन गट असे एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषद आणि पत्रकबाजी करून आपापली बाजू मांडत होते. दरम्यान या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे आमदार, विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढताना तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसने धानोरकर की वडेट्टीवार यामध्ये शेवटपर्यंत संभ्रमाची अवस्था निर्माण केलेली आहे. यांच्यामध्ये तिकिटावरून मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती.