
नागपूर(Nagpur): महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे गुरुवारी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनीही महाराजांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. प्रशांत वावगे तसेच प्रकल्प संचालक मा. कुणाल शिरसाठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना मा. मिलिंद नारिंगे यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, रयतेप्रती असलेल्या संवेदनशील बांधिलकीचा आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचा उल्लेख केला. स्वराज्य ही केवळ सत्ता नसून ती लोककल्याणाची संकल्पना होती, असे सांगत त्यांनी उपस्थितांना महाराजांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन मा. मिलिंद नारिंगे यांनी केले. या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी धम्मा गजभिये, विकास तिळगुळ, मयूर चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक शुभम वैलथरे यांच्यासह ‘महाज्योती’ चे सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंकज पाचारे
प्रकल्प अधिकारी
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),
महाराष्ट्र राज्य, नागपूर















