मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अयोध्येला जाणार

0

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांचा अयोध्या दौरा अखेर निश्चित झाला आहे. ६ ते १० एप्रिल या दरम्यान हा दौरा प्रस्तावित असून मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ४० आमदार देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार (CM Eknath Shinde to visit Ayodhya in April) आहेत. त्याचप्रमाणे शरयू नदीच्या काठी पूजा आणि आरतीही करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे आमचे ठरलेच होते, अशी माहिती शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी दिली. त्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी तारखा जाहीर केल्या आहेत.

या दौऱ्याची जवळपास महिनाभरापासून याची चर्चा आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही करतील. अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी सुरु आहे. त्याची पाहणी देखील मुख्यमंत्री शिंदे करणार आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत मंदिराच्या उभारणीचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. राजकीय दृष्टीने देखील या दौऱ्याला मोठे महत्व आहे. २१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे जून महिन्यात मुख्यमंत्री झाले.