“सहकारी पक्षांच्या जागा ठरवा..”

0

काँग्रेसचा मित्रपक्षांना टोला!

मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरुच आहे. आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सहकारी पक्षांच्या जागा ठरवा, उमेदवार नको, असा टोला मित्रपक्षांना लगावला आहे. एक प्रकारे त्यांनी मित्रपक्षांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. इंडिया आघाडी वाचविण्याची जबाबदारी केवळ काँग्रेसची नसून ती मित्रपक्षांचीही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय निरुपम यांनी एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, लोकसभेच्या जागा वाटपासाठी आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होत आहे. प्रक्रिया तीच आहे. मुंबईतच प्राथमिक चर्चा होणार होती. बिहार आणि बंगालमध्ये जे घडले त्यातून आपण नक्कीच शिकले पाहिजे. एकमेकांचा आदर राखूनच जागांबाबत निर्णय घ्यावा. असा निर्णय जो सर्वांना मान्य असेल. आणि हो, फक्त जागा ठरवा, इतर पक्षांचे उमेदवार नाही. अन्यथा महाआघाडीत असंतोषाचे तडे वाढू लागतील. इंडिया आघाडीला वाचवण्याची जबाबदारी फक्त काँग्रेसची नाही तर सर्वांची आहे, असे स्पष्ट मतही निरुपम यांनी व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडीच्या गुरुवारी पार पडलेल्या प्रदीर्घ बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चार जागा देण्याबाबत काहीच निश्चित ठरले नसल्याचे सांगून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊत यांना उघडे पाडले होते. त्यामुळे जागावाटपाचे सूत्र अंतिम व्हायला आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले. आज आता महाविकास आघाडीची बैठक पुन्हा होत आहे. बिहार आणि बंगालमध्ये इंडिया आघाडी फुटल्याने आघाडीतील तिन्ही पक्ष आता सावधगिरीने पावले टाकत आहेत.