Home NAGPUR NEWS विकसित भारत २०४७ साठी योगदान द्या – पद्मश्री प्रा. गणपती यादव

विकसित भारत २०४७ साठी योगदान द्या – पद्मश्री प्रा. गणपती यादव

0

 एलआयटी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

नागपूर (Nagpur) १३ जानेवारी २०२६ :- विकसित भारत २०४७ साकारण्यासाठी नव्या पिढीतील अभियंत्यांनी तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन पद्मश्री प्रा. गणपती यादव यांनी केले. तंत्रज्ञानातील प्रगतीशिवाय कोणताही देश विकसित होऊ शकत नाही, असे सांगत लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (लिटू) ही मध्य भारतातील नाविन्य, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाचे केंद्र ठरू शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. नागपूर येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे आयोजित एलआयटी विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. हा दीक्षांत समारंभ राव बहादूर लक्ष्मीनारायण यांच्या १४९व्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी एलआयटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष पद्मश्री प्रा. गणपती यादव होते. मुख्य अतिथी म्हणून मॉईल लिमिटेडचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च, नवी दिल्लीचे संचालक प्रा. नितीन सेठ यांच्यासह एलआयटीचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, राज्यपाल नामनिर्देशित सदस्य उत्कर्ष खोपकर, विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा. यादव म्हणाले की, रिसायकल इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, मॉलिक्युलर सिम्युलेशन आणि डिजिटल ट्विन्स हे भविष्यात संशोधनाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. आयआयटींसोबत सुसंगत राहण्यासाठी एलआयटीमधील प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहून नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ ऊर्जा, जल व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना सक्षम प्रशिक्षण दिल्यास एलआयटी जागतिक विद्यापीठांशी समकक्ष ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, मॉईल लिमिटेडचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना यांनी विदर्भातील मँगनीज बेल्ट देशाच्या एकूण मँगनीज उत्पादनाच्या सुमारे २० टक्के वाटा उचलत असून २०३० पर्यंत हा वाटा ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. मँगनीज व स्टील क्षेत्रातील संशोधनासाठी दिवंगत राव बहादूर डी. लक्ष्मीनारायण यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. सातत्याने ज्ञान अद्ययावत ठेवणे, आर्थिक साक्षरता, आरोग्य आणि शिस्त यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती देत प्रशासकीय इमारत तसेच वसतिगृहांची उभारणी प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. संपूर्ण परिसर सौरऊर्जेवर आधारित असल्याने एलआयटी कार्बन-न्यूट्रल असल्याचे त्यांनी नमूद केले. लवकरच बायोटेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग, व्यवस्थापन, बहुविषयक एमएससी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयातील नवीन अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रा. नितीन सेठ यांनी गुरुजनांचे महत्त्व अधोरेखित करत, “काम इतके उत्कृष्ट करा की तेच तुमची ओळख बनेल,” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. जग भारताकडे महासत्ता म्हणून पाहत असून त्यामागे विविध शाखांतील विद्यार्थी व शिक्षकांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यगीत व विद्यापीठ गीताने समारंभाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. एलआयटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष पद्मश्री प्रा. गणपती यादव यांनी दीक्षांत सोहळ्याची औपचारिक घोषणा केली.

दीक्षांत समारंभाचे यशस्वी आयोजन कुलसचिव प्रा. नीरज खटी,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप शेंडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ शिल्पा पांडे, विभाग प्रमुख डॅा प्रतिभा अग्रवाल,डॅा भारत भनवासे, डॅा.जयंत मोडक,डॅा अर्चना मुन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पसायदान व राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

सुवर्ण सन्मान :
या दीक्षांत सोहळ्यात ८२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना ५ सुवर्णपदके व ५ रौप्यपदके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. रसायन अभियांत्रिकी शाखेतील सुवर्णपदक विजेते रोहन पटले, विजय कापसे, किरण बोंडे आणि फसाह ख्वाजा मसरूर अहमद यांचा समावेश होता. तसेच एमएससी बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रेमलाल भूआर्या, हरीश गुरुनानी; एमएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये सुनील बोकडे, मोहम्मद वसीम शेख; तर एमएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये जयंत कुमार यावलकर आणि जनार्दन सिंग यांना सन्मानित करण्यात आले.