
9 महिन्यांत 35 कोटींची अनियमितता उघड, वीज चोरांचे धाबे दणाणले!
नागपूर (Nagpur) दि. 14 जानेवारी 2026:- महावितरणच्या ‘सुरक्षा व अंमलबजावणी’ विभागा अंतर्गत कार्यरत भरारी पथकांनी नागपूर प्रादेशिक विभागात (विदर्भात) वीजचोरी विरोधातील मोहिमेचा धडाका लावला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत विभागाने सुमारे 35.95 कोटी रुपयांची वीजचोरी व अनियमितता उघडकीस आणली असून, 308 ग्राहकांवर फौजदारी गुन्हे केले आहेत.
कारवाईचा सविस्तर आढावा: 2,214 ठिकाणी थेट चोरी: भरारी पथकांनी या नऊ महिन्यांत विदर्भातील एकूण 7,771 ग्राहकांच्या वीज जोडण्यांची कसून तपासणी केली. यामध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांचा समावेश होता. या तपासणी मोहिमेत धक्कादायक वास्तव समोर आले असून, तब्बल 2,214 ग्राहकांकडे थेट वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. या चोरांविरुद्ध ‘विद्युत कायदा 2003’ मधील सुधारित ‘कलम 135’ अन्वये कडक कारवाई करण्यात आली आहे. या एकाच कलमांतर्गत 25.43 कोटी रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
कलम 126 अंतर्गत अनियमिततेवरही टाच: थेट वीजचोरीव्यतिरिक्त, विजेचा अनधिकृत वापर किंवा मंजूर भारापेक्षा अधिक वापर करणाऱ्या ग्राहकांवरही महावितरणने लक्ष केंद्रित केले आहे. विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 अन्वये एकूण 890 प्रकरणांमध्ये 10.52 कोटी रुपयांची अनियमितता उघड झाली आहे. वीजचोरी आणि अनियमितता अशा दोन्ही कारवाया मिळून एकूण 35.95 कोटी रुपयांच्या दंडाचे निर्धारण करण्यात आले. त्यापैकी 31.03 कोटी रुपयांची विक्रमी वसुली महावितरणने संबंधित ग्राहकांकडून केली आहे.

308 ग्राहकांवर पोलीस कारवाई; तुरुंगवासाची टांगती तलवार: ज्या ग्राहकांनी चोरीची रक्कम आणि दंडाचा भरणा करण्यास टाळाटाळ केली, त्यांच्या विरोधात महावितरणने आता पोलीस बडगा उगारला आहे. नागपूर परिक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 308 वीज ग्राहकांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वीज चोरी हा केवळ दंडनीय अपराध नसून, तो फौजदारी गुन्हा आहे, असा स्पष्ट संदेश महावितरणने दिला आहे.
भरारी पथकांचे जाळे आणि अत्याधुनिक यंत्रणा: महावितरणचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कंपनीचा सुरक्षा व अंमलबजावणी विभाग अविरतपणे कार्यरत आहे. ही संपूर्ण यंत्रणा कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), मुंबई यांच्या अधिपत्याखाली काम करत आहे. नागपूर प्रादेशिक विभागात या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्यात मंडळ स्तरावर 12 विशेष भरारी पथके, विभागीय स्तरावर 3 मुख्य भरारी पथके आणि नागपूर आणि अकोला परिमंडलात स्वतंत्र सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये कार्यरत आहेत. या पथकांकडे अत्याधुनिक साधने असून, संशयास्पद वीज वापर असलेल्या ठिकाणांची माहिती मिळताच ही पथके तातडीने छापे टाकतात.
नागरिकांसाठी सुवर्णसंधी: माहिती द्या आणि बक्षीस मिळवा!: वीजचोरी हा एक सामाजिक अपराध आहे. यामुळे वीज वितरण हानी वाढते आणि पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांवर त्याचा बोजा पडतो. हे रोखण्यासाठी महावितरणने जनतेला सहकार्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती स्थानिक भरारी पथक किंवा जवळच्या महावितरण कार्यालयास द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाते आणि त्या इसमास महावितरणकडून योग्य बक्षीस देऊन सन्मानित केले जाते.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कार्यकारी संचालक अपर्णा गिते आणि नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुनील थापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी विरोधातील विशेष मोहीम राबवली जात आहे. “नागरिकांनी चोरट्या मार्गाने वीज न वापरता अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा आणि महावितरणला सहकार्य करावे,” असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.














