कोरोना : परिस्थीती नियंत्रणात पण काळजी घेण्याचे आवाहन

0

नागरिकांनी घाबरू नये ; सरकारने घेतला आढावा


नागपूर. चीनमध्ये आढळून आलेला बीएफ 7 हा कोरोनाचा व्हेरियंट पूर्वी आपल्या देशात आढळलेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या नवीन रुपातल्या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घाबरू नयेत. कोव्हिड परिस्थती नियंत्रणात आहे. परंतू, कोरोनावर मात करण्यासाठी टेस्टिंग, ट्रेकिंग, ट्रीटमेंट, वॅक्सिनेट आणि कोविडअनुरुप वर्तन ही पंचसूत्री वापरावी,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सध्या राज्यात केवळ 134 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ 7 हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.

राज्यात 2216 कोव्हिड रुग्णालये


आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या 2216 कोविड रुग्णालये असून 1 लाख 34 हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पंचसूत्रीचे निदेंश
चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीतून दिलेल्या सूचना


-वरिष्ठ नागरिकांनी तसेच अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांनी गर्दीचे ठिकाण टाळावे
-सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा
-सर्दी खोकला ताप असल्यास आरटीपीसीआर चाचणीवर भर द्यावा
-कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रतिबंधक डोसबर भर द्यावा
-प्रत्येक जिल्ह्यातील कोविड लसीकरण करून घ्यावे
-रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी
-कोविड सेंटरमध्ये अतिदक्षता विभागातील जीवनरक्षक प्रणाली सज्ज असावी
-व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन प्लांट सुरू असल्याची खातर जमा करावी
-आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग सुरू करावे
-राज्य टास्क फोर्स स्थापन करून तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात येईल.


राज्यात कोरोनाला घाबरावे अशी स्थिती नाही. मात्र, खबरदारी घेण्याची गरज आहे. चाचण्या, ट्रेकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पंचसूत्री पाळावी.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा