संतप्त महिलेचा विधानमंडळाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न
राज्यात महापुरुष आणि संतांचा खुलेआम अपमान सुरू आहे. पण, लायकी नसताना महापुरुषांबाबत रळणाऱ्यांवर कुठलीच कारवाई होत नाही. राज्य सरकारही याबद्दल मौन बाळगून आहे, असा आरोप करत एका महिलेने नागपूर विधिमंडळाच्या द्वारावर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत सदर महिलेने केलेले विधान संतांचा अपमान करणाऱ्यांबाबत चीड व्यक्त करणारे आहे. सरकार काहीच कारवाई करीत नाही, यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.
शिवाजी महाराज की जय.. बाबासाहेब आंबेडकर की जय… अशा घोषणा देत अचानकच या महिलेने विधानभवनाच्या मुख्य दारासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतलं. तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवले आणि पुढील अनर्थ टळले. सध्या नागपूर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तिला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती आहे.
तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करता, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता, त्यांच्या नावावर राजकारण करता… वारकरी संप्रदायाचा अपमान करता… तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही.. तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाही… अशा शब्दांत या महिलेने संताप व्यक्त केला आहे.