उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार

0

दिशा सालियन प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा काँग्रेसचा दावा


नागपूर: दिशा सालियान प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा आरोप केला असून फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग (Congress to bring Privilege Motion Against DCM Fadnavis) आणला जाणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांपासून लक्ष विचलित करण्यासाठी दिशा सालियान प्रकरण उकरुन काढण्यात आले, असाही काँग्रेसचा आरोप आहे. काल गुरुवारी राज्य सरकारने दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयने केलला नाही, अशी माहिती फडणवीस यांनी काल दिली होती. मात्र, फडणवीस दिशाभूल करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाची चौकशी केली होती. यासंदर्भातील रिपोर्ट देखील काँग्रेसकडे आहे. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा करताना सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली नसल्याची खोटी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली. हा सभागृहाचा अवमान आहे. आम्ही सोमवारी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार आहोत.
दिशा सालियान प्रकरण कधीच सीबीआयकडे गेले नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेले होते, अशी माहिती फडणवीस यांनी गुरुवारी दिली होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता, कोणालाही टार्गेट न करता नवीन पुरावे काही असतील तर त्यासंदर्भात चौकशी होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा