गडचिरोलीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
दोन जहाल नक्षल्यांचा खात्मा

0


गडचिरोली. दक्षिण गडचिरोली परिसराला लागून असलेल्या छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. अहेरी तालुक्यातील दामरंचा गावापलीकडे छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होते. त्या परिसरात नक्षल्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या सी -६० पथकाचे जवान आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलीस दिसताच नक्षल्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन नक्षलवादी ठार झाले.


दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. तिच्याकडून एक बंदूक ताब्यात घेतल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे या भागात नक्षल्यांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याबाबत चर्चा मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्या आधारे पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नक्षली असल्याची खात्री होताच ऑपरेशन राबविले गेले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी पत्राद्वारे सरकारलाच आव्हान दिले होते. गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनाही या पत्रातून धमकावण्यात आले होते. त्यानंतर आठवडाभराच्या आतच कारवाई करण्यात आली. पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य महिलेचाही खात्म्यामुळे नक्षलचळबळीला मोठा धक्का आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा