वर्ग खोलीतच झोपला शिक्षक ; नशेत असल्याचा दावा
कारवाईची मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

0


गोंदिया. जिल्हा परिषदेच्या शाळा विविध कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी गळणार्या वर्गखोल्या, शिक्षकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांची गळती अशी विविध कारणे असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ग्रामीण भागातील शाळा टिकविण्याचे आव्हान आहे. त्यातच आता गोरेगाव तालुक्यातील निंबा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा वेगळाच प्रताप पाहावयास मिळाला. एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला बदनाम केल्याचा प्रकार शुक्रवारी गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या निंबा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घडला. शिक्षक जी.आर.मरसकोल्हे हे शाळेत दारू पिऊन आले. झिंगलेल्या अवस्थेतच त्यांनी वर्गखोलीत प्रवेश केला. त्यांची अवस्था बघून विद्यार्थी घाबरले. त्यांनी याची माहिती मुख्याध्यापक नंदेश्वर आणि पालकांना दिली. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना हा प्रकार माहित होताच शाळा गाठली. यावेळी शिक्षक मरसकोल्हे हे वर्गखोलीत झोपून होते. यावेळी शिक्षक तथा कर्मचार्यांनी दारुड्या शिक्षकाला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान निंबाच्या सरपंच वर्षा पटले, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे, बुधराम बिजेवार, पालक, गावकरी यांनी गोरेगाव पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भातील तक्रार नोंदविली. शिक्षकाच्या या प्रतापामुळे गावकरी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.


शिक्षण विभागाने हा प्रकार गांभिर्याने घेतला आहे. निंबा शाळेत शिक्षक दारू पिऊन असल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणविभागाकडून सांगण्यात आले.


निंबा शाळेतील प्रकार निंदनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन झाली आहे.माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचार्यांना निंबा येथे पाठवून पंचनामा करून शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शिक्षकावर पंचायत समिती स्तरावरून कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार असल्याचे गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले.


तीन वर्षांपूर्वीही निलंबिन


शिक्षक मरसकोल्हे यांना दारूचे व्यसन आहे. देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिक्षण आयुक्तांकडे कारवाई संदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे. तसेच शिक्षक मरसकोल्हे यांच्यावर कारवाईसाठी जून व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शिरसाठ यांनी सांगितले

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा