विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची नागपूर विमानतळावर कोरोना चाचणी

0


-मनपा आयुक्तांचे निर्देश, आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

नागपूर : केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात येणाऱ्या सर्व परदेशी प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले असून आरोग्य व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.
कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशाच्या अनुषंगाने राज्य सरकारही प्रतिबंधात्मक खबरदारीसाठी कामाला लागले आहे. सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) डॉ. भिसे तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) डॉ. खडसे, प्रशासनाचे अधिकारी, ‘नीरी’चे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार, विमानतळ प्रशासनाचे अधिकारी कृष्णा पॉल प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरात दोहा आणि शारजाह येथून दर आठवड्याला सहा विमाने येतात. शनिवारपासून या विमानातून येणा-या प्रवाशांची स्क्रिनिंग करून त्यापैकी २ टक्के प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी नंतर घेण्यात आलेले नमुने मेडिकल, एम्स आणि मेयो येथील पॅथॉलॉजीमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
याशिवाय शहरातील इतर व्यक्तींच्याही चाचणीसाठी मनपाद्वारे ३९ चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण ४३ लाख ८५ हजार ३६४ डोस पूर्ण झालेले आहेत. मात्र, अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली रुग्णालय, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयसोलेशन हॉस्पीटल, आयुष दवाखाना या पाचही आरोग्य केंद्रांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन व्यवस्थेची तपासणी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथेही ऑक्सिजन बेड्सच्या व्यवस्थेबाबत आढावा घेत त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेता बेड्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे.

लक्षणे असल्यास करा चाचणी
कोरोना संबंधी कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. अँटिजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या या केंद्रांवर करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोव्हिड संबंधित कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपली चाचणी करून घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करण्याचेही आवाहन मनपा आयुक्त यांनी केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा