पाटील – जाधव यांच्यातील संवादाचा व्हीडिओ व्हायरल ; मनसेसह शिंदे गटाकडून टोलेबाजी
नागपूर. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (NCP MLA Jayant Patil) यांचे निलंबन व विरोधकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार (Boycott of Assembly proceedings ) टाकला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा भरवत त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केले. यावेळी काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान प्रसार माध्यमांसमोर बाजू मांडण्यासाठी विरोधक एकवटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार माईकस्टॅडसमोर उभे होते. काँग्रेस नेतेही होते. पण, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) काहीसे लांब होते. जयंत पाटील यांनी शिवसेनेचे भास्कर जाधव कुठे आहेत अशी विचारणा केली. त्यावर होय आहे, असे उत्तर दिले. त्यावर पाटील यांनी आमची शिवसेना असा उल्लेख केला. जाधव यांनी पुन्हा होय आमची शिवसेने, असे वाक्य उच्चारले. पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीची असा उल्लेख केला. जाधव यांनीही होय राष्ट्रवादीची शिवसेना असे उत्तर दिले. ही संपूर्ण चर्चा विनोदी सूरात सुरू होते. या संवादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मनसेसह बाळासाहेबांची शिवसेना नेत्यांनीही त्यावर टोलेबाजी करीत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे.
या व्हिडीओवरून मनसेने निशाणा साधला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हि़डीओ शेअर केला आहे. “पोटातलं ओठांवर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना – जयंत पाटील… भास्कर जाधव यांनीही मान्य केलं आहेच! असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
काळे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह जयंत पाटील माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी बोलताना जयंत पाटील यांनी “आमची शिवसेना आहे. राष्ट्रवादीची शिवसेना आहे, असे विधान केले. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलखुलासपणे हसत दाद दिल्याचे दिसते. यावरूनच मनसेने खोचक टोला लगावला आहे. शिंदे गटातील नेत्यांकडूनही या संवादावर भाष्य करीत टीका केली जात आहे.