Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत सहा मृत्युमुखी

0

Tirupati Balaji Temple Stampede : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले. ४००० हून अधिक भाविक उपस्थितीत असताना ही चेंगराचेंगरी झाली. वैकुंठ एकादशीचे टोकन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एक दिवस आधीपासून रांगेत उभे राहिले होते. मात्र प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा बळी गेला. या घटनेनंतरही हजारो भाविक टोकन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह 6 जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुईया सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिकिटांसाठी ९१ काउंटर उघडण्यात आले  होते. काउंटरजवळ चार हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे होते. त्यांना बैरागी पट्टिडा पार्कमध्ये रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले होते. टोकन मिळवण्याच्या नादात गोंधळ उडाला आणि लोक पळताना एकमेकांच्या अंगावरुन धावून गेले. या घटनेत मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती घेतली आणि घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. ते गुरुवारी तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.