
नाशिक NASHIK “घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. तुमचे मत मतदानाच्या रुपाने देऊन लोकशाहीस सहयोग करता येईल. नवमतदार लोकशाहीत नवी उर्जा आणि शक्ती आणू शकतात. त्यामुळे मत नोंदविण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत येणे आवश्यक असून त्यासाठी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या राजकीय विचारांपेक्षा तुमचे मतदान खूप महत्वाचे आहे. तुमच्यासाठी हा अमृतकालप्रमाणेच कर्तव्यकाळ देखील आहे”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आज केले.
युवक आणि क्रीडा विभागातर्फे येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी हे आवाहन केले. जमलेल्या युवा समुदयाला त्यांनी संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी युवाशक्तीची जाणीव करून देत देशातील लोकशाही वाचविण्यासाठी येत्या निवडणुकीत राजकीय मते मांडण्यापेक्षा मतदान करण्याचे आवाहन केले. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांचा सहभाग जितका अधिक असेल तितके राष्ट्राचे भविष्य चांगले असेल, असे सांगून मोदी म्हणाले, अमृतकाळच्या आजच्या तरुण पिढीवर माझा खूप विश्वास आहे.
या कालखंडात देशातील अशी युवापिढी तयार होत आहे जी गुलामीच्या दबावात आणि प्रभावापासून मुक्त आहे. भारताची युवा पिढी आयुर्वेदाचे ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारा. त्यांच्या काळात जेवणात बाजरीची भाकरी, कुटकी, रागी, ज्वार असायचे. पण गुलामीच्या मानसिकतेत या अन्नाला गरिबीसह जोडले गेले. यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढले गेले. हेच अन्न आता मिलेट्सच्या रुपात सुपर फूडच्या रुपात पुन्हा स्वयंपाकघरात पोहोचत आहे. आता तुम्हाला श्री अन्नचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनायचे आहे. यामुळे तुमचे आरोग्यही सुधारेल आणि देशातील शेतकऱ्यांचेही भले होईल, असे मोदी म्हणाले.