नवी दिल्लीः देशातील सर्व बँकांमध्ये दोन हजाराच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार असून लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करू नये. नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांची मुदत असून लोकांनी शांततेने जाऊन बँकेतून नोटा बदलून घ्याव्या, असे आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी केले आहे. 30 सप्टेंबरच्या मुदतीनंतरही दोन हजारांची नोट वैधच ठरणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या नोटा बदलाव्या किंवा खात्यात जमा करता येणार आहेत. मंगळवारपासून देशातील सर्व बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यादृष्टीने रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक सूचना दिल्या असून बँकांना उष्णतेच्या दृष्टीने सावलीची जागा आणि लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, किती नोटा बदलल्या आणि किती जमा झाल्या याचा रोजचा हिशोब व्यवस्थित ठेवावा, असे सांगण्यात आले आहे. चार महिन्यांचा कालावधी असल्याने लोकांनी उगाच गर्दी करू नये, असे आवाहनु गव्हर्नर दास यांनी केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जे नोटा जमा करू शकणार नाहीत, त्यांच्याबाबत वेगळा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.