- पत्रकार भवनात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा
नागपूर: ईपीस-95 योजनेअंतर्गत मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढवून द्या, या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणे आंदोलन, खासदारांना निवेदन देण्यात आल्यानंतर आता राज्य सरकारला देखील घेरण्याची तयारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी चालविली आहे. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याची घोषणा ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी आज केली.
ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भ यांनी संयुक्तपणे गुरुवारी पत्रकार भवन येथे आयोजिलेल्या पेन्शनर मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार विनोंद देशमुख, कर्मचारी समनव्य समितीचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार दादा तुकाराम झोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
ईपीएस पेन्शनसंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच जो निकाल दिला त्यामुळे 1-9-2014 पर्यंत निवृत्त झालेल्या सर्वांना पेन्शन मिळेलच. पण त्यानंतर सेवेत लागलेल्यांनाही पेन्शन लागू राहील, असा खुलासा करून समन्वय समितीचे राष्ट्रीय सल्लागार दादा झोडे यांनी या निकालाबाबतचा सेवनिवृत्तांबद्दलचा संभ्रम दूर केला.
कोश्यारी समितीच्या शिफारशींची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सरचिटणीस अँड.अविनाश तेलंग यांनी यावेळी केले.
यापुढे संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आणि सरकारला जाग येणार नाही, असा इशारा समन्वय समितीचे नागपूर अध्यक्ष श्याम देशमुख यांनी दिला. मेळाव्याचे संयोजक पत्रकार विनोद देशमुख यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. मोठ्या संख्येने विविध विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी यावेळी उपस्थित होते.