मुंबईः लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन (Economic Corporation for Folk Artist) करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी (Leader of Opposition Ajit Pawar) राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणाही व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोक कलावंतांसाठी निवास, भोजन, औषधोपचारांची सोय, वृध्दाश्रम सुविधा, तसेच त्यांना अल्पव्याजाने कर्ज, मुलांच्या शिक्षणाची सोय, शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी पत्रातून केली आहे.
तमाशाकलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तमाशाकलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. लोककलावंतांच्या वाट्याला येणारे हे दुःख टाळण्यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचे कामकाज लवकरात लवकर सुरू करून लोककलावंतांना दिलासा द्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.