चर्चेनंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम

0

(Jalna)जालना : राज्यात मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन ठिकठिकाणी हिंसक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली.सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत त्यांनी कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन, शिंदे समिती अशा विविध विषयांवर चर्चा केली. मात्र, मराठा समाज नोंदीनुसार अर्धवट आरक्षण घेणार नाही, अशी भूमिका (Manoj Jarange)मनोज जरांगे यांनी घेत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला यामुळे पेच अद्यापही कायम आहे. सध्या मराठवाड्यात परिस्थिती नियंत्रणात आहे.

मंगळवारी सकाळी (Chief Minister Shinde) मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांच्याशी संवाद साधला. नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही व अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांनी स्पष्टच सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा २००४ चा जीआर दुरुस्त करा.

शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ६० ते ६५ टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये आहे. आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान,जरांगे यांनी सांगितले कालपासून पाणी पितोय. मी पाणी पिल्याने समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

 

मराठा आंदोलक आक्रमक तहसील कार्यालयाला ठोकले टाळे

पंढरपूर – मराठा आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची आक्रमकता वाढलेली असतानाच आज पंढरपूर शहरातील मराठा बांधवांनी एकत्र येत पंढरपूर तहसील कार्यालयाचे कामकाज बंद करून तहसील कार्यालयाला टाळे ठोकले आहे. पंढरपूर नगरपरिषद कुलूप बंद केल्यानंतर आज तहसील कार्यालयाला टाळे ठोकून प्रशासकीय कार्यालय सुरू ठेवू नये.सुरू ठेवल्यास होणाऱ्या नुकसानास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाजाने दिला.

 

नागपुरातही जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

शिवाजी पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाचे उपोषण

(nagpur)नागपूर – मराठा आरक्षणवरून राज्यात आंदोलन सुरू असताना काल यवतमाळ पर्यंत आंदोलन झाले मंगळवारी सकाळपासून उपराजधानी नागपुरात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नागपुरात महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजाचे पदाधिकारी प्रकाश खंडागे यांनी सांगितले की, आमचे आंदोलन साखळी उपोषण स्वरूपात राहणार असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला होता. त्यामुळे आता वेळ देऊनही सरकार काही करणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा यावेळी अमोल माने यांनी दिला. रात्री 8 वाजता तुळशीबाग येथून कँडल मार्च देखील मराठा समाजातर्फे काढला जाणार आहे.