
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून इको-प्रो व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम
चंद्रपूर (Chandrapur):- ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू’ अशा शब्दांत ज्यांचे वर्णन केले जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर शहरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. दरवर्षीच्या परंपरेनुसार, यावर्षीही इको-प्रो संस्था आणि राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मेकॅनिकल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
चंद्रपूर शहराला लाभलेल्या ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याच्या संवर्धनासाठी ही मोहीम राबवण्यात आली. ऐतिहासिक रामाळा तलावास लागून असलेल्या किल्ल्याच्या बगड खिडकी, बुरुज क्रमांक ४ वर युवकांनी मिळून स्वच्छता अभियान राबविले. यात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक आणि इको-प्रोचे स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.

ऐतिहासिक वारशाचे जतन:
केवळ घोषणा देऊन नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून शिवरायांचे विचार जपणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. किल्ल्याच्या बुरुजावर साचलेला कचरा, वाढलेली रानटी झुडपे आणि प्लॅस्टिक काढून परिसराला चकाकी देण्यात आली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प यावेळी केला. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, ऐतिहासिक वास्तूंकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या निमित्ताने तरुणाईमध्ये पाहायला मिळाला.
या कार्यक्रमात इको-प्रोचे बंडू धोतरे, प्रा. प्रमोद सहारे, कुणाल देवगिरकर, अभय अमृतकर, राजू काहीलकर विद्यार्थी अभय विश्वकर्मा, वैभवी रागणकर, चेतन तत्कंटीवार, काजल घनोडे, नीरज नंदनवार, राजेश आसवले, मोहन उरकुडे, हर्षवर्धन झाडे, सुमेध चांदेकर, सोमेश्वर झाडे, विक्रांत दाणो, देवांश डाकरे, शमी विश्वकर्मा, अथर्व हरणे, आदित्य विश्वकर्मा, रचित कालेश्वर, अनिकेट मोरे, आदित्य ब्राह्मणकर, अश्विन डोंगरे सहभागी झाले होते.
“किल्ले हे आपले जिवंत वैभव आहेत. त्यांच्या स्वच्छतेतूनच आपण आपल्या राजाला खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा देऊ शकतो. तरुण पिढीमध्ये ही संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.”
बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो
“ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याच्या परकोट संरक्षणाबाबत जनजागृती व्हावी व महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाचा प्रत्यक्ष सहभाग घेत कृतीशील कार्यक्रमात सहभाग म्हणून पर्यावरण आणि इतिहास संवर्धनाचा मेळ घालून इको-प्रो सोबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.”
प्रा. प्रमोद सहारे, राजीव गांधी महाविद्यालय














