Home Breaking news वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ

0

नागपूर(Nagpur), दि. २१ फेब्रुवारी २०२६: थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लहान ताजबाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध अदखलपात्र (NCR) गुन्ह्याची नोंद केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार सुनीलकुमार राजकुमार जैन (४८, रा. वेसा, नागपूर) हे नवीन सुभेदार विद्युत वितरण केंद्रात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या पथकासह, ज्यात कर्मचारी खोब्रागडे, सपना कटाळे, राहुल जोगे, कोयल आणि राऊत यांचा समावेश होता, थकीत वीज बिल वसुली मोहिमेवर होते.

 

हे पथक लहान ताजबाग दरबार परिसरातील ग्राहक शरद भोसले यांच्याकडे थकीत बिलाची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विक्रम भोसले (४०) याने पथकाला मज्जाव केला. “तुम्ही माझ्या घरी कसे काय आले?” असा जाब विचारत त्याने सहायक अभियंता जैन आणि त्यांच्या महिला सहकारी सपना कटाळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, ‘तुम्हाला पाहून घेतो’ अशी धमकी देऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले.

या घटनेनंतर महावितरणच्या पथकाने तातडीने सक्करदरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अजित बनकर यांनी या घटनेची दखल घेत आरोपी विक्रम भोसले विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २२१, ३५१(२) आणि ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. हे प्रकरण अदखलपात्र स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची समज दिली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे लाट उसळली आहे.