Home Breaking news महावितरणचे आवाहन:फसव्या वीजबिल संदेशांपासून सावधान, अन्यथा बँक खाते रिकामे होईल!

महावितरणचे आवाहन:फसव्या वीजबिल संदेशांपासून सावधान, अन्यथा बँक खाते रिकामे होईल!

0

नागपूर(Nagpur), दि. 21 फेब्रुवारी 2026: महावितरणने वीज ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या वीजबिल भरण्यासंदर्भातील फसव्या संदेशांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सायबर हॅकर ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी सक्रिय झाले असून, अशा संदेशांमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा महावितरणने दिला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲपवर या फसवणुकीपासून कसे वाचावे, याची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वीजबिल वसुलीची मोहीम सुरू असतानाच, सायबर गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. अनेक वीज ग्राहकांना ‘तुमचे वीजबिल अपडेट नाही आणि आज रात्री वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्वरित दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा,’ अशा प्रकारचे बनावट संदेश येत आहेत. जर ग्राहकाने या क्रमांकावर संपर्क साधल्यास, त्यांना ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. असे केल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक होऊन बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा बनावट संदेशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून येणारे अधिकृत संदेश: महावितरण केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच अधिकृत संदेश पाठवते. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल दुरुस्ती, तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास लागणारा संभाव्य कालावधी, मासिक वीजबिलांची रक्कम, मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहन, मीटर रीडिंगची तारीख व वापरलेली युनिट संख्या, वीजबिलाची देय दिनांक आणि वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस, यांसारख्या माहितीचा समावेश असतो. महावितरण कधीही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगत नाही. वीजबिलाबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास, ग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
• महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही.
• महावितरण केवळ VM-MSEDCL/VK-MSEDCL/AM-MSEDCL/JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरूनच एसएमएस पाठवते. कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवले जात नाहीत. (SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि संदेश पाठवण्याचे ठिकाण दर्शवतात.)
• बिलाच्या पेमेंटसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका.
• मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नका.
• ऑनलाइन पेमेंट करताना आपला मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा मिळालेला ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका.
• अशा फसवणुकीची तक्रार जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर किंवा 1930 या हेल्पलाइनवर नोंदवा.
• अधिक माहितीसाठी 1912, 19120, 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधा.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर