
नागपूर(Nagpur) १४ फेब्रुवारी :
अभिजात मराठी व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ Mumbai व विदर्भ साहित्य संघतर्फे आयोजित “गझल संध्या” कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार व कवी बबन सराडकर यांनी आपल्या स्वरचित गझलांचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. मराठी भाषेतील पहिल्या गझलकार म्हणून परिचित ज्येष्ठ कवयित्री आशा पांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या गझल संध्येमध्ये “पिंजरे झाले साऱ्या घरांचे, हा कसा आला जमाना”, “सध्या गवताच्या फुलण्याला सुख म्हटले मी”, “याद येते हरवलेल्या माणसांची याद येते”, “चोचीला चार कुठला ही कुणी विचारत नाही”, शेती व मातीतल्या नात्यावर आधारित गझल तसेच “वेदनांच्या डोंगराला लांधा तरी येत नाही” आणि “सत्वाच्या खडतर वाटेवर चालत गेलो” अशा विविध आशयघन गझला सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व संपूर्ण वातावरण काव्यमय झाले.
गझलेच्या स्वरूपावर भाष्य करताना ज्येष्ठ कवयित्री आशा पांडे म्हणाल्या, “गझल ही खरी वेदनेतून निर्माण होते. गहिऱ्या जखमेची ललकारी म्हणजे गजल आणि समाजाला जेव्हा झटके देते तेव्हा ती खऱ्या अर्थाने गझल ठरते. जेव्हा माणसाला वेदना कळते आणि तो वेदनेशी एकरूप होतो, तेव्हा वेदनेतून वेद निर्माण होतात आणि त्यातूनच गझल जन्माला येते. आजच्या सादरीकरणातील सर्व गझला एकापेक्षा एक सरस होत्या. त्या केवळ ऐकायच्या नव्हत्या, तर अनुभवायच्या होत्या.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विवेक आलोणी यांनी केले.















