सरकारची शिष्टमंडळाशी चर्चा, आता निर्णयाकडे लक्ष

0

(Jalna)जालना-राज्य सरकार आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा रात्री मुंबईत पार पडल्यावर बैठकीत झालेल्या निर्णयाचा बंद लिफाफा घेऊन शिष्टमंडळ आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे.(Maratha agitation issue) या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर उपोषणकर्ते (Manoj Jarange)मनोज जरांगे हे निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज बारावा दिवस असून अद्याप राज्य शासन आणि उपोषणर्ते यांच्यात तोडगा निघालेला नाही. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला, तरी सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. काल मुंबईत राज्य सरकार आणि शिष्टमंडळात बैठक झाली. त्यातही तोडगा निघालेला नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय एका बंद लिफाफ्यातून मनोज जरांगे यांना पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जरांगे यांनी उपोषण सोडावे, असे सरकारचे प्रयत्न असताना ते आज काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे.