
नागपूर (Nagpur):- ग्रामीण व स्थानिक उद्यमांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणारा बहुप्रतिक्षित ७ वा ग्रामायण उद्यम एक्सपो २०२५चा उद्घाटन सोहळा शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथे पार पडणार आहे. ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग, धरमपेठ, नागपूर येथे होणार आहे.
“उद्यमी बनें – आत्मनिर्भरता की ओर बढ़ें!” आणि “स्वदेशी – लोकल से व्होकल” या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात विदर्भातील लघु उत्पादक, ग्रामीण उद्योजक, कुटीर उद्योग, हस्तशिल्पकार तसेच सामाजिक संस्थांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे थेट उत्पादन करणाऱ्या उद्यमींवर केंद्रित मांडणी असून, B2B आणि B2C यांचा प्रभावी संगम साधण्यात आला आहे. त्यामुळे उद्यमींना नवे विक्रेते, विक्रेत्यांना नवे उत्पादने आणि ग्राहकांना थेट खरेदीचा लाभ मिळणार आहे.
उद्घाटन समारंभ माजी महापौर सौ. कुंदाताई विजयकर यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक तथा व्हीआयएचे माजी अध्यक्ष श्री. सुरेश राठी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी सौ. हेमा देशपांडे, तसेच ग्लोबल अलायन्स फॉर मास एन्टरप्रिनरशिप (GAME) अंतर्गत महाराष्ट्र उद्यमिता मिशनचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल योगेश भावसार उपस्थित राहणार आहेत.
हा ग्रामायण उद्यम एक्सपो २६ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. VIA ऍग्रो रुरल डेव्हलपमेंट अँड फूड प्रोसेसिंग फोरम आणि सॅटर्डे क्लब, Vidarbha यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्यमींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७६६५०५४५०८














