आदित्य ठाकरेकडे बघून म्हणाले आता तुमचा विषयच संपला
नागपूर. पायऱ्यांवरील घोषणाबाजीनंतर विधानसभेतही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई- सूरत रस्त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरून मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. प्रथम शंभूराजे देसाई यांनी सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. शिल्लक सेनेत राहिलेल्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. एवढी काळजी त्यांनी घ्यावी, असे शंभूराज देसाई म्हणाले. ठाकरेंवर गुलाबराव पाटील यांनीही पलटवार केला. सूरत आणि गुवाहाटीवरून चर्चा करायची असेल, तर यांना दाखवतो मात्रोश्रीचे रस्ते कसे होते, कसे झाले. आता तुमचा विषय संपला असल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अनुसरून आदित्य ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केला. “शहरात चुकीच्या बाजूने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढलं आहे. सिग्नल तोडणे जात असून, यावर कारवाई होणं गरजेचं आहे, अन्यथा अपघात होत राहणार. तसेच, राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही शिस्त न पाळता वाहने चालवले जातात. यांच्यावर नुसती दंडात्मक कारवाई न करता तात्काळ जागेवर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळ एस पूल आहे. तिथे लाईटची सुविधा नाही, अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, एक सूचना अशी आहे, सरकारला पटते का बगा? मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये एक रस्ता असा आहे. जिथे ४० लोक रात्री आणि दिवसा पण पळून जायचे. तो रस्ता आहे, मुंबई-सुरतचा. त्या रस्त्याची एकदा गुणवत्ता पाहावी. मग, पळता येत, धावता येत आणि तिथून गुवाहाटीला सुद्धा जाता येत,” असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
याला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडलेले मुद्दे आदित्य ठाकरेंनी परत उपस्थित केले. विरोधी पक्षनेत्यांना उत्तर दिले, तेच त्यांनाही माझे उत्तर आहे. पण, सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. शिल्लक सेनेत राहिलेल्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. एवढी काळजी त्यांनी घ्यावी, असे शंभूराज देसाईंनी सांगितले.
गुलाबराव पाटील म्हणाले, विरोधी पक्षानेत्यांनी विचारलेला प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. सूरत आणि गुवाहाटीवरून चर्चा करायची असेल, तर यांना दाखवतो मात्रोश्रीचे रस्ते कसे होते, कसे झाले. तुम्ही सुरत कसे गेले, गुवाहाटी कसे गेले, हे बोलण्याची गरज नाही. गेले, आता तुमचा विषय संपला,” अशा संतप्त शब्दात गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदविली.