विराट दीपयज्ञाने पावन प्रज्ञा पुराण कथेचा समारोप
नागपूर, मारूती देवस्थान ट्रस्ट आणि अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या प्रज्ञा पुराण कथेचा समारोप मंगळवारी सायंकाळी विराट दीपयज्ञ व भारतमाता पूजनाने करण्यात आला.
दीपयज्ञाचा शुभारंभ सीमा मनीष नुवाल व रमेश गांधी, तसेच रा. स्व संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यासोबतच भारतमाता पूजन जगदीश बियाणी, विवेक गुप्ता, शोभा आपटे, अश्विनी वाघमारे, रवींद्र वाघमारे, दिलीप तालेवार, आशिष नाईक, बागेश महाजन, राहुल मानधनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कथावाचक पं. शामबिहारी दुबे यांचे पूजन व आशीर्वाद ग्रहण रा. स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले.
– गायत्री महायज्ञाची बुधवारी समाप्ती
प्रज्ञा पुराण कथा गायत्री महायज्ञ सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी शेकडो भाविकांनी यज्ञात आहुती समर्पित केली. त्यानंतर सायंकाळी प्रज्ञा पुराण कथेचे कथावाचक पं. शामबिहारी दुबे यांनी समारोपीय विवेचन केले. कथेपूर्वी श्री. विनय आणि सौ. मुक्ता दाणी यांच्या हस्ते कथाग्रंथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री रमेश बंग, उद्योगपती शैलेश वेद, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर सपत्निक, राधेश्यामजी हेडा, दीपक हेडा, अशोक पत्की उपस्थित होते.
मंगळवार, 31 डिसेंबर म्हणजे 2024 चा अखेरचा दिवस व नववर्ष स्वागताचा दिवस असल्याने कथास्थानी 30 बाय 20 आकारातील भारतमातेची भव्य रांगोळी साकारण्यात आली.
या रांगोळीभोवती 1008 हून अधिक पारंपरिक दीप प्रज्वलित करण्यात आले आणि नयनमनोहर दृश्य साकारण्यात आले. दोन दिवस खर्ची घालून वर्षा रेहपाडे यांनी ही अद्वितीय रांगोळी अतिशय कौशल्याने साकारली. याशिवाय गायत्री परिवारातर्फे मुख्य प्रवेशद्वारावर फुलांनी स्वस्तिक, ओम, समई साकारून त्यावर कलात्मक पद्धतीने दिव्यांची रचना करण्यात आली. सायंकाळी 7 वाजताच एकाच वेळी सर्व दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. हे दृश्य पाहण्यासाठी आणि प्रज्ञा पुराणाचा समारोप श्रवणासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. दीपयज्ञाच्या परिसरात अखिल गायत्री परिवारातर्फे लावण्यात आलेल्या साहित्य विक्री स्टॉलवर देखील भाविकांनी धार्मिक साहित्य खरेदी केले. दीपयज्ञाचे विहंगम दृश्य कॅमेराबद्ध करण्याचा मोह उपस्थितांना आवरता आला नाही. प्रज्ञा पुराण कथेचा समारोप गायत्री मातेच्या महाआरतीने झाला.
………………………………
प्रज्ञा पुराण पारायणाने कुरितीतून मुक्ती शक्य : पं. दुबे
चौर्यांशी लक्ष योनीतून सर्वात शेवटी मानव जन्म मिळतो, पण त्या जन्मानंतर देखील विविध योनीतील स्वभाव वैशिष्ट्ये माणसाचा पाठलाग सातत्याने करीत असतात. यातून मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रज्ञा पुराण कथेचे पारायण आवश्यक आहे. त्यातून जीवनातील अज्ञान मार्गाने येणार्या कुरितीतून मार्ग काढणे शक्य असल्याचे प्रतिपादन अखिल विश्व गायत्री परिवारचे आंतरराष्ट्रीय कथावाचक पं. शामबिहारी दुबे यांनी केले.
गायत्री महायज्ञाचे चार दिवस पूर्ण झाल्यानंतर बुधवारी अखेरच्या दिवशी इच्छुकांना यज्ञात सहभागी होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली असून सकाळी 8 ते 10 दरम्यान होणार्या यज्ञात निःशुल्क परंतु नोंदणी करून सहभाग घेता येईल, असे आयोजकांनी कळविले आहे.