मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात आज पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. आजपासून देशभरात वळवाच्या पावसाचे संकेतही मिळत आहेत. तेव्हा आगामी पाच दिवसांत 4 ते 5 अंशांनी तापमान कमी होईल. मान्सून लवकरच तामिळनाडूच्या दिशेने येत आहे. तेव्हा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आलाय. 28 मेपर्यंत मान्सून कर्नाटकात आणि 3 ते 4 जूनच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान ढगाळ आहे. दरम्यान, 23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे.
मान्सूनबाबत स्कायमेटच्या अंदाज
मान्सूनचा स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 7 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तीन दिवस उशिराने हा पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. सुरुवातीला उशीर होईल आणि प्रायद्वीपीय भारतापेक्षा प्रगती थोडी कमी होईल. देशाच्या मध्य आणि उत्तर भागात यावर्षी जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहील. हे खरिपाच्या पेरणीसाठी चांगले असणार नाही.
स्कायमेट वेदरने सांगितल्यानुसार, विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर शक्तिशाली चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला अडथळा ठरणारे असेल.