हायड्रोजन हाच जगाचा भविष्यातील उर्जा तारणहार

0

(Padmashri Dr. Ganapati Yadav)पद्मश्री डॉ. गणपती यादव यांचे निरीक्षण

(Nagpur)नागपूर, 10 फेब्रुवारी
जगाचे तापमान 2027 पर्यंत 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल, असे भाकित खगोल, पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञांनी मांडले आहे. जगाच्या पाठीवर दरवर्षी उत्सर्जित होणारे 34.4 अब्ज टन कार्बन उत्सर्जनामुळे हे घडत आहे. यात एकट्या भारताचा वाटा 2.622 अब्ज टन आहे. पृथ्वीच्‍या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पर्यायी हरित उर्जेचा वापर करण्यासाठी हायड्रोजन हाच जगाचा उर्जा तारणहार ठरेल, असे सुक्ष्म अभ्यासपूर्ण शास्त्रीय निरीक्षण पद्मश्री रसायनशास्त्रज्ञ गणपती यादव यांनी शनिवारी येथे नोंदविले.

इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) व आयईईई (नागपूर उपविभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन हायड्रोजन अँड क्लिन एनर्जी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. आज शनिवारी वनामती येथे एलआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री गणपती यादव यांच्‍या हस्‍ते परिषदेचे उद्घाटन झाले. मंचावर पावर ग्रीडचे माजी संचालक डॉ. व्ही. के. खरे, मॉईलचे शाखा व्यवस्थापक अखिलेश रॉय, इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे सचिव महेश शुक्ला, संयोजक एस. एफ. लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

भविष्यात पर्यावरणाला वाचवायचे असेल तर आपल्याला 840 मिलीयन मेट्रिक टन हायड्रोजन लागेल, असे सुरुवातीलाच नमूद करीत पद्मश्री यादव म्हणाले, चीन, अमेरिका, युरोपियन संघानंतर भारत हा कार्बन उत्सर्जन करणारा चौथा देश आहे. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन उत्सर्जनापेक्षा बांधकाम क्षेत्रात उत्सर्जित होणारे कार्बन सर्वाधिक आहे. बांधकाम उद्योगाचा कार्बन उत्सर्जनातील वाटा 33 टक्के आहे. हे घातक आहे. जगाचे तापमान वाढत असल्याने पर्यावरणातले संतुलनही ढासळत आहे. त्यासाठी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इंधनापेक्षा सौर, पवन आणि हायड्रोजन उर्जेचा पर्याय निवडणे ही मानवाचीच नाही, तर पृथ्वीची गरज आहे, असे ते म्‍हणाले.

 

पर्यायी उर्जा हेच भविष्यातील इंधन यावर आणखी शास्त्रीय प्रकाश टाकताना पावरग्रीडचे माजी संचालक डॉ. खरे म्हणाले, इलेक्टिकवर धावणाऱ्या गाड्या वापरल्या म्हणजे आपण पर्यावरण प्रेमी आहोत, असे होत नाही. या गाड्या चार्ज करण्यासाठी जी वीज लागते तिची निर्मिती करण्यासाठी कोळसा जाळला जातो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत असेल तर ते काहीही कामाचे नाही. त्यामुळे कार्बन उत्सर्जन न करणारे पवन, सौर आणि हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन आणि उर्जेचा पर्याय आहे.

प्रारंभी समन्वयक लांजेवार यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका मांडली. सतिश रायपूरे यांनी परिषदेला उपस्थित पाहुण्यांचे स्‍वागत केले. या दोन दिवसीय परिषदेत देश-विदेशातून 350 प्रतिनिधी सहभागी होत असून 70 हून अधिक शोधनिंबध सादर केले जाणार आहेत.