प्रादेशिक गरजांनुसार सॉफ्टवेअर क्षेत्रात व्हावे संशोधन

0

 

(Union Minister Mr. Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या इन्क्युबेशन सुविधा केंद्राचे उद्घाटन

 

(Nagpur)नागपूर – प्रत्येक प्रदेशाच्या गरजा, क्षमता आणि उणिवा ओळखून स्टार्टअप्स तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक समस्या समजून घेत आपल्या संशोधनातून सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे कल्याण कसे होईल, याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या (एसटीपीआय) नागपुरातील इन्क्युबेशन सुविधा केंद्राचे आज उद्घाटन झाले. त्यावेळी ना. श्री. नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार, एसटीपीआय पुण्याचे महासंचालक संजय कुमार गुप्ता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. एसटीपीआयने विद्यापीठ, स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांच्याशी समन्वय साधून काम करावे. समन्वय, संवाद आणि सहकार्य या त्रिसूत्रीच्या आधारावर सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडविण्याच्या दृष्टीने त्यातून नक्कीच सकारात्मक मार्ग सापडेल, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. ‘माहिती तंत्रज्ञान उद्योगातील आयात कमी करून निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने एसटीपीआय सुविधेचा फायदा होईल.

त्यातूनच आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू शकतो,’ असे सांगतानाच नागपूरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या क्षेत्रात काम करणारे सेंटर ऑफ एक्सलन्स आणि आंत्रप्रेन्यूअरशिप स्थापन झाले पाहिजे अशी अपेक्षा ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली. देशातील सर्वांत मोठ्या पाच आयटी कंपन्यांपैकी चार कंपन्या मिहानमध्ये आल्या आहेत. भविष्यात इतरही कंपन्या येणार आहेत. आतापर्यंत मिहानमध्ये ६८ हजार युवकांना रोजगार मिळाला असून पुढील एक वर्षात आपण १ लाख युवकांना रोजगार मिळेल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.