“मी उद्धव ठाकरेंसोबतच…” ज्येष्ठ नेते मनोहर जोशी

0

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर कोण कुठल्या गटात व कोणासोबत आहे, याबाबत अद्यापही अंदाजच लावले जात असताना माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Former CM Manohar Joshi clears his Political Stand) यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मनोहर जोशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. यावेळी बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, माझं रक्त हे शिवसेनेचं आहे. “पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास लाभतो आहे. मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो, याचे मला समाधान आहे” असे मनोहर जोशी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे मनोहर जोशी हे शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैमध्ये शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचाही समावेश होता. यावेळी जोशी कुटुंबीयांकडून एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर दोन नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली होती. तेव्हापासूनच मनोहर जोशी हे शिंदे गटात दाखल होणार काय, या विषयी चर्चा सुरु होती. मध्यंतरीच्या काळात मनोहर जोशी हे शिवसेनेत एकटे पडले व आताही जोशी यांची परिस्थिती अशीच असल्याचे मानले जाते. त्यामुळ ते शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त होत होती.