
(Hingoli)हिंगोली : हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar) हे सातत्याने वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहतात. मात्र, आता आमदार बांगर हे वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. चर्चा आहे त्यांनी दिलेल्या चॅलेंजची! २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिले आहे.
बांगर यांनी अशा स्वरुपाचे चॅलेंज देण्याची ही काही पहिली वेळ नाही. कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिले होते. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असे बांगर म्हणाले आहेत. संतोष बांगर हे शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख आहेत. मागील आनेक वर्षांपासून ते जिल्हाप्रमुख आहेत. बांगर यांना 2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दिली आणि कळमनुरी मतदार संघातून ते निवडून आले. सत्ता संघर्षात ते गुवाहटीला न जाता सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते.