Home Top News प्रेमविवाहाच्या वादातून भुसावळात अमानुष मारहाण; तरुणाला विवस्त्र करून गावभर धिंड, पाच जण...

प्रेमविवाहाच्या वादातून भुसावळात अमानुष मारहाण; तरुणाला विवस्त्र करून गावभर धिंड, पाच जण अटकेत

0

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून एक धक्कादायक आणि अमानुष घटना समोर आली आहे. खडका गावातील एका तरुणाने आपल्या समाजातीलच तरुणीसोबत नाशिक येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याने संतापाच्या भरात त्यांनी तरुणावर क्रूर हल्ला केल्याची माहिती आहे. संशयितांनी प्रथम तरुणीला मारहाण करून तिला जबरदस्तीने सोबत नेले आणि त्यानंतर तरुणाला पकडून खांबाला बांधत विवस्त्र अवस्थेत लोखंडी रॉड व दगडांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याची दुचाकीवरून गावभर धिंड काढण्यात आली.

या घटनेदरम्यान तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने काही स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत त्याची सुटका केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे, तर इतर संशयितांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.