सांगली :(sangali) मुख्यमंत्रीपदावरून मागील काही दिवसात राज्यात चर्चा सुरु आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची नावे झळकली असताना आता राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी भावी मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे नाव पुढे करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. जयंत पाटील (Jayant Patil As Future CM) यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा कोल्हे यांनी व्यक्त केली असून जयंत पाटील यांचे सुपूत्र प्रतिक पाटील यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन देखील त्यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील असे खासदार कोल्हे म्हणाले.
सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात खासदार कोल्हे बोलत होते. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद ज्या माणसाने भूषवले आहे आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो आहे, या शब्दात कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवार(Ajit pawar)यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असतानाच आता खासदार कोल्हे यांनी जयंत पाटील यांचे नाव पुढे केल्याने राष्ट्रवादीत यावरून गटबाजीला जोर आला की काय, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच नेतृत्वबदलाचे संकेतही मिळत आहेत. पक्षात रस्सीखेच सुरु झाल्याचे हे चित्र असल्याची चर्चा आहे.