Home NAGPUR NEWS कणगी ट्रान्स कॅफे कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

कणगी ट्रान्स कॅफे कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

0

15 तृतीयपंथी व्यक्तींना गिरवले स्वावलंबनाचे धडे

नागपूर, 16 मार्च :

तृतीयपंथी समुदायाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “कणगी ट्रान्स कॅफे कार्यशाळा 2026” ला नागपुरातील “विष्णुजी की रसोई”, बजाज नगर येथे उत्साहात प्रारंभ झाला.
16 ते 18 मार्चदरम्यान चालणाऱ्या या तीन दिवसीय निःशुल्क प्रशिक्षण कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी नंदुरबारच्या आदिवासी भागातून आलेल्या 15 तृतीयपंथी व्यक्तींनी स्वावलंबनाचे धडे गिरवले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नाट्य विभागातील सहायक प्राध्यापक विजय जथे यांनी बॉडी लँग्वेज आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन करताना आत्मविश्वास, परस्पर सन्मान आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. योग्य कौशल्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते, असा संदेश त्यांनी दिला.
या सत्रात आकार फिल्म्सच्या रेणू अग्रवाल यांनी लघुउद्योगातील अकाउंटिंग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले, तर गौरव द्विवेदी यांनी हायजीन व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. अनन्या बनसोड यांनी क्लाऊड किचन संकल्पना स्पष्ट केली. तसेच महा चहाचे प्रदीप कुलकर्णी यांनी सहभागींसाठी विशेष संधी जाहीर करत, काम करण्याची इच्छा असलेल्या निवडक दहा सहभागींसाठी ‘महा चहा’ स्टॉल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

कार्यशाळेच्या पुढील सत्रांमध्ये उद्या, 17 मार्च रोजी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे कुकिंग मार्गदर्शन तसेच शीतल म्हात्रे (सिनिअर अॅडव्हायझर) आणि मॅकॉय कमिशनर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे संचालक कपिलेश मंगल देखील सहभागींसाठी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.