Politics of beed district : आता खोक्या भोसलेचीही मुलाखत? काय तमाशा चालला आहे हा? – सुनील कुहीकर

0

Politics of beed district :आपल्या समाजात सध्या नेमकं काय सुरू आहे हेच कळत नाही. कोणाला मोठं करायचं, कोणाला छोटं करायचं, कोणाचे पंख छाटायचे, कोणाचं जीवन संपायचं, कोणाला राजकारणात अगदी वरच्या स्तरावर नेऊन ठेवायचं याच्यासाठी चाललेले सगळे डावपेच सर्वसामान्य जनतेच्या आकलनापलीकडचे ठरताहेत. आणि दुर्दैवाने माध्यमं देखील त्याचा एक भाग बनत चालली आहेत. आणि हे सर्वात जास्त घातक आहे.

सध्या बीड जिल्ह्याचे राजकारण टीपेला पोहोचले आहे. या जिल्ह्यातील गुंडगिरी आणि गुंडांचे राजकारणाशी जुळलेले धागेदोरे प्रकर्षाने समोर येत आहे. आणि या गुंडगिरीच्या माध्यमातून चाललेले जे राजकारण सर्वदूर दिसून येत आहे ते बघितल्यानंतर, त्याला मिळणारी प्रसिद्धी बघितल्यानंतर आपण नेमके कुठे चाललो आहोत, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग नावाच्या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्या हत्येचं ज्या पद्धतीने राजकारण सर्वदूर सुरू आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष या प्रकरणाचा राजकीय आणि जातीच्या अँगलने दुरुपयोग करण्याच्या दृष्टीने जो पुढाकार घेत आहेत, असा पुढाकार घेण्यासाठी म्हणून जो तो मैदानात उतरला आहे, ते बघितल्यानंतर आणि या संपूर्ण प्रकरणाला मिळणारी माध्यम जगतातील प्रसिद्धी बघितल्यानंतर सगळेच्या सगळेच या प्रकरणाचा गैरफायदा उपटण्यासाठी समोर आले आहेत की काय, असा प्रश्न पडतो. सुरुवातीच्या काळात हे एकूणच संपूर्ण प्रकरण धनंजय मुंडे यांच्या विरोधात नेण्याच्या दृष्टीने, त्यांचा तो कराड नावाचा साथीदार अडकवत, त्याच्या विरुद्ध रान पेटवण्याच्या दृष्टीने जे राजकारण झालं, त्यात धसांपासून तर दमानियांपर्यंत सगळेच मैदानात उतरले. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या लोकांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले असते, तर ते स्वाभाविक होतं. कारण ते होणे आवश्यक आहे. एखाद्या सरपंच पदावरच्या व्यक्तीची, केवळ तो गावातल्या एखाद्या उद्योगाकडनं कोणाला खंडणी वसूल करू देत नाही किंवा खंडणी वसूल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आडवा येतो, म्हणून त्याची दहा-बारा लोक मिळून हत्या करतात, ही हत्या आम्ही केली असं दाखवण्यासाठी त्याचा व्हीडिओ तयार करतात, हत्येसाठी सराईतपणे वेगवेगळी शस्त्र वापरली जातात. आम्ही असेही करू शकतो, जो कोणी आमच्या आड येईल त्याला नेस्तनाबूत करण्याची ताकद आम्ही राखतो हे जगाला दाखवून देण्यासाठी म्हणून त्याचे पुरावे तयार करणारे लोक हत्येच्या घटनेचे व्हीडिओज तयार करतात असे लोक, एखादा मृतदेह समोर पडलेला असताना निलाजरेपणाने हसणारी, खिदळणारी माणसं जर आपल्या समाजामध्ये असतील, तर त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे. नव्हे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करणे, त्यांच्यावर कारवाई करणे, याहीपेक्षा या प्रकरणाचे निमित्त साधून, आपलं राजकीय प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याचा डावही साधण्याचे चाललेले राजकारण जराही लपून राहिलेले नाही. या प्रकरणाचा असा दुरुपयोग वेगवेगळे लोक करून घेताना दिसताहेत हे खरे आहे . हे योग्य आहे का, असा सवाल या प्रकरणात नक्कीच उपस्थित झाला आहे.

आमदार सुरेश धस या प्रकरणात पूर्ण ताकतीने मैदानात उतरले यात शंकाच नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने हा मुद्दा उचलून धरला, लावून धरला, त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला ही वस्तुस्थिती आहे. पण मग सुरेश धस यांनीही त्या जिल्ह्यातल्या राजकारणात वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने मुंडे कुटुंबाचा होणारा अडचण अडसर दूर करण्यासाठी त्यांनीही या प्रकरणाचा उपयोग करून घेतला का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे.

आता हे संपूर्ण प्रकरण एका विशिष्ट पातळीवर पोहोचले आहे. या प्रकरणात आता चार्जशीट दाखल झाली आहे. गुन्हेगारांना पूर्वीच अटक झाली आहे .आता काही दिवसांनी या प्रकरणाची कोर्ट केस सुरू होईल. आणि त्यानंतर कोर्टाच्या स्तरावर साक्षी पुरावे, तपासणी, वकिलांचे ऑर्ग्यूमेंट्स अशा सगळ्या गोष्टी होतील. आणि शेवटी न्यायालयाचा निकाल जाहीर होईल. केवळ खालच्या न्यायालयाचाच नाही तर कोणी वरच्या न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, तर त्याही कोर्टामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन नंतर सरते शेवटी कोर्टाचा निर्णय लागेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या प्रक्रियेला एक विशिष्ट कालावधी लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता कोणीही कितीही घाई केली, अमुक अमुक कराडला भर चौकात फाशी द्या वगैरे मागणी केली, म्हणून काही तशी फाशी दिली जाईल अशी काही वस्तुस्थिती नाही. मुळात आपल्या देशामध्ये एक कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात आहे. आणि कुणाला पटो वा न पटो, पण त्या व्यवस्थेनुसारच हा देश, इथला कारभार चालतो. परिणामी, कुणाच्यातरी मनात आहे म्हणून या प्रकरणात आरोपींना फाशी दिली जाईल असं होणार नाही. या पार्श्वभूमीवर आता या घटनेशी संबंधित बातम्या मिळवण्याची मर्यादा संपत चालल्याने,
आम्ही काहीतरी वेगळं देतो आहे असं सांगण्याची, दाखवण्याची जी शर्यत माध्यम जगतात लागली आहे, ती बघितल्यानंतर टीआरपीच्या नादात सारेच लोक खूप खालचा स्तर गाठण्यासाठी धडपडताहेत की काय, असे वाटू लागले आहे. सुरेश धसांचा मुद्दा प्रकर्षाने जगासमोर यावा म्हणून त्यांची विस्तृत मुलाखत, एकदा नव्हे चार चार वेळा घेतली जाणे एक वेळ समजताही येईल. स्वाभाविकही मानता येईल ते. पण आता कोणीतरी त्यांच्या चेल्या चपाट्यांपैकी एक असलेला खोक्या भोसले नावाचा एक गावगुंड. आताच्या राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर चिल्लर माणूस. तो कधीतरी सुरेश धसांच्या आजूबाजूला दिसला होता म्हणून आता बातम्यांचा सगळा फोकस त्याच्यावर केंद्रीत करण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो कीव करण्याजोगा आहे. तो माध्यमांचा स्तर उंचावणारा आहे की पातळीच्या बाबतीत निच्चांक गाठणार आहे, हे ठरवण्याची खरंच गरज निर्माण झाली आहे.

काल-परवा तर एका चॅनेलने या खोक्याचा विस्तृत इंटरव्यू दाखवला. पोलिसांच्या हाती लागत नाही अशा या टुकार गुंडाला पकडून त्याची मुलाखत घेण्याची डोकेबाज चॅनलची कल्पना अफलातून आहे.

काय चाललं आहे या समाजात? कुठल्या स्तराचे राजकारण करतो आहोत आपण? कुठल्या स्तराची बातमीदारी चालली आहे ही? या नादात एका गावगुंडाला मोठे करण्याच्या पातकांचे अपश्रेय कुणाला द्यायचं? कोण आहे कोण हा खोक्या भोसले? टीव्हीवर त्याची मुलाखत यावी असं काय कर्तृत्व गाजवलं आहे त्यानं? त्याच्या आधीच्या सगळ्या व्हीडिओ क्लिप्स बघितल्या तर तो कोणाला तरी मारताना, पैसे उधळताना दिसतो. हरणाची शिकार केल्याचा आरोप असलेल्या खोक्या नावाच्या चिल्लर गुंडाला सेलिब्रिटी करण्याचे पाप कोण, कशासाठी करतंय? त्याची मुलाखत लोकांच्या माथी मारून, नेमकं माध्यम जगताला काय सांगायचं आहे? टीआरपीच्या नादात अडकलेल्यांना, आपण नेमकं काय करतो आहोत हे जर कळत नसेल, तर बातमी हीच असते, अशीच करायची असते, अशीच गाजवायची असते, असा गैरसमज पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने आलेल्या पिढीला होईल ना! कोण घेईल त्या पातकची जबाबदारी?Politics of beed district