
पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक
भद्रावती (Bhadravati) :-
प्रेरणास्थान गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती तालुक्यातील कोची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘सिखे’ शैक्षणिक प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्जनशील कौशल्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या ‘सिखे’ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणित व भाषा विषयांवर आधारित विविध शैक्षणिक मॉडेल्स सादर केली. गणित विषयात अपूर्णांक समजावून सांगणारी आकर्षक व उपयुक्त मॉडेल्स लक्षवेधी ठरली. तर भाषा विषयांतर्गत गोष्टींची पुस्तके, चित्रांच्या साहाय्याने गोष्ट तयार करणे, शब्द व वाक्यांच्या माध्यमातून गोष्ट रचना करणे आदी उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
चित्रांच्या माध्यमातून गोष्ट सांगण्याच्या पद्धती, गोष्टीचे घटक तसेच गोष्ट मांडणीचे विविध टप्पे दर्शविणारी मॉडेल्सही प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात गावातून जनजागृती रॅली काढून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
यावेळी सिखे जिल्हा समन्वयक मा. हर्षवर्धन डांगे, कोची व घोनाड ग्रामपंचायतीचे सरपंच मा. महेंद्र भोयर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. गजानन बोढे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व समिती सदस्य उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले.
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सिखे संस्थेचे कोच शंकर बांधुरकर, प्रेम जरपोतवार, प्रशिक शेंडे, कल्याणी भोसकर, सोमेश्वर पेंदाम, शुभम मेश्राम तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी चिंचोलकर व सहशिक्षिका मनीषा चन्नावार यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता चौथीची विद्यार्थिनी वैदेही जगताप हिने केले.














