
विदर्भ साहित्य संघाच्या पुढील काळात होऊ घातलेल्या यंदाच्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपावरून सध्या वातावरण तापले असताना या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे एक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी भाजपाच्या विविध स्तरावरील नेतृत्वाला पत्र लिहिण्याच्या चालवलेल्या सपाट्यावर, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आक्षेप नोंदविले आहेत. श्रीपाद जोशी यांना उद्देशून काही प्रश्नही धनंजय कुलकर्णी यांनी जाहीरपणे विचारले आहेत. कुलकर्णी यांनी जोशींना लिहिलेले पत्र त्यांच्याच शब्दात…
प्रति
मा श्रीपाद जोशी
माजी पदाधिकारी
विदर्भ साहित्य संघ , नागपूर .
विषय -महाराष्ट्रातील साहित्य संस्थाच्या निवडणूका व सत्ताधारी भाजपचा या निवडणूकीतील हस्तक्षेप .
सस्नेह नमस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषद , विदर्भ साहित्य संघ , एशियाटिक सोसायटी या साहित्य क्षेत्रातील मान्यवर संस्थांच्या निवडणूका होत आहेत . या निवडणूका प्रदिर्घ काळाने होत आहेत . येथील प्रस्थापीत सत्ताधारी गेली दशकभर विविध तांत्रीक , कायदेशीर , सामाजिक , व्यावहारिक कारणे देऊन निवडणूका टाळून साहित्य संस्थातील सत्ता उपभोगत आहेत . ही वस्तुस्थिती प्रथम स्वीकारली पाहिजे .
लोकशाही , कायदा मानणाऱ्या साहित्य संस्थेच्या आजीव सभासदांनी प्रथम या सत्ताकांक्षी वृत्तीचा विरोध केला पाहिजे . या संदर्भात सर्व संबंधीत , राजकीय , सोईस्कर , स्वार्थी मौन बाळगून आहेत . या विषयावर श्रीपाद जोशी व मंडळी पत्र लिहून आपले मत व्यक्त करणार की नाही ?
साहित्य संस्थेतील सत्तेचे राजकारण , प्रत्यक्ष राजकारण करून राजकीय सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांनाही लाजवेल इतक्या हिन पातळीवर आहे याची श्रीपाद जोशीं सारख्या साहित्य क्षेत्रातील जाणकार व्यक्तीला चाची कल्पना नाही का ? का ते ही या साहित्य क्षेत्रातील राजकारणी असणारे आहेत , त्यांच्या साहित्य क्षेत्रातील राजकीय सत्तेला आव्हान निर्माण झाल्या मुळे साहित्य संस्थातील निवडणूकीत सत्ताधारी भाजपचा हस्तक्षेप या वर त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे ?
साहित्य संस्थेतील राजकारण , येथील मानाचे सत्तास्थान , साहित्य पुरस्कार , प्रकाशन व्यवसायातील अर्थकारण , ज्ञासकीय समित्यावरील नियुक्त्या , साहित्य संमेलन अध्यक्ष पद या भोवती केंद्रीत आहे . या साहित्य संस्था डाव्या , नक्षली विचारांच्या प्रभावाखाली रहाव्या यासाठी आजपर्यंत पूर्वीच्या सत्ताधारी कॉग्रेस पक्षानी साहित्य संस्थेतील सत्ताधाऱ्यांना दिलेली साथ . तसेच या साहित्य संस्थेतील सत्ते द्वारा समाजात डाव्या विचारांचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न . या सर्व उपक्रमांना डाव्या विचारांच्या पत्रकारांनी माध्यमांद्वारा मिळवून दिलेले माध्यम कवच . या साहित्य संस्थातील सगळ्या व्यवस्थेला या निवडणूकीत आव्हान निर्माण झाले आहे म्हणून श्रीपाद जोशी आपला उद्वेग आपल्या पत्र लेखनातून व्यक्त करत आहेत का ?
बरे विदर्भ साहित्य संघ , महाराष्ट्र साहित्य परिषद या दोन शतकी उज्वल परंपरा असणाऱ्या साहित्य संस्थांची स्थापना करण्यात लोकमान्य टिळक त्यांचे राजकीय वारस न चिं केळकर , दादासाहेब खापर्डे , न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे या प्रभुतींच्या पुढाकाराने झाली . या सर्वांनी राजकीय , सामाजिक , साहित्यिक चळवळीचे नेतृत्व केले आहे . ही वस्तुस्थितो असताना साहित्य संस्थान मध्ये राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप नको अशी भूमिका श्रीपाद जोशी कशी घेऊ शकतात ?
तसेच विद्यमान स्थितीत अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष पदाच्या निवडीत शरद पवार यांचा असलेला हस्तक्षेप संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मान्य केला आहे . या विषयावर श्रीपाद जोशी यांनी कधी आक्षेप घेणारे पत्र लिहल्याचे निदर्शनास आलेले नाही .
मूळात साहित्य क्षेत्र , साहित्य संस्था या मराठी जनतेसाठी , साहित्य प्रेमांसाठी , साहित्य संवर्धनासाठी आहेत . तेथे कोणालाही प्रवेशबंदी करता येणार नाही . सत्ताधारी राजकीय नेतृत्वाने या साहित्य संस्था निवडणूकीत हस्तक्षेप करू नये अशी भूमिका घ्यायची व नंतर याच नेतृत्वाकडे पद , पुरस्कार , समिती नियुक्ती यासाठी खेटे घालयचे असे दुटप्पी राजकारण साहित्य संस्था पदाधिकारी करतात का ?
सत्ताधारी राजकीय नेत्यांनी साहित्य संस्थाना अनुदान , पुरस्कार देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे . पण येथे विसंगती दिसते हे नमुद केले पाहिजे .
सबब श्रीपाद जोशींनी साहित्य संघ निवडणूका आपल्या प्रतिमा , प्रतिष्ठा , साहित्य सेवा या भांडवलावर लढवाव्या . त्यासाठी त्यांना शुभेच्छा . पण निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी राजकीय नेतृत्वावर हस्तक्षेप बंदी घालून आपला निवडणूक विजय , सुरक्षीत करण्यासाठी आपल्या पत्र अस्त्राचा उपयोग त्यांना होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे .
स्पष्ट मत प्रदर्शन आपण खुल्या मनाने स्वीकाराल असा विश्वास वाटतो .
धन्यवाद!
धनंजय कुलकर्णी
कार्याध्यक्ष
महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती
पुणे
दिनांक – ७ फेब्रुवारी २०२६















