
कायद्याचा बडगा उगारल्याने हल्लेखोरांना होणार जेल
नागपूर, दि. 7 मार्च 2026: महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेदरम्यान, वीजपुरवठा खंडित करण्यासाठी जाणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आता महावितरणने अधीक गांभिर्याने घेतल्या आहेत. थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा काही ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागतो, ज्यात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि काही ठिकाणी मारहाणीचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या असह्य प्रकारांना चाप लावण्यासाठी आता महावितरणने अत्यंत कठोर धोरण अवलंबले असून, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आता कोणत्याही कर्मचाऱ्याला अंगावर धावून जाणे किंवा मारहाण करणे कायद्याने मोठा गुन्हा ठरणार असून, अशा हल्लेखोरांना थेट कोठडीची हवा खावी लागणार आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आता महावितरणने कायद्याचा आधार घेत शिक्षेची तयारी केली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांनुसार आता दोषींवर कारवाई केली जाईल. प्रामुख्याने, कलम 132 (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेला हल्ला किंवा वापरलेले बळ) अंतर्गत दोषींना 5 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड होऊ शकतो. जर कर्मचाऱ्याला मारहाणीदरम्यान गंभीर दुखापत झाली, तर कलम 121 (2) अंतर्गत दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणे किंवा घाबरवणे, या कृत्यांसाठी कलम 351 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांत वीज तोडणीसाठी गेलेल्या पथकांवर धाकदपट दाखविणाऱ्या प्रवृत्तींना यामुळे मोठी चपराक बसणार असून, पोलिसांनी या प्रकरणांत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई केवळ थकीत बिल वसुलीसाठी नसून, ती महावितरणच्या आर्थिक शिस्तीचा एक भाग आहे. वर्षानुवर्षे वीजबिल थकवूनही ‘आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही’ या आविर्भावात वावरणाऱ्या काही ग्राहकांमुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. सामान्य नागरिक आपली जबाबदारी ओळखून कष्टातूनही बिल भरतात, परंतु गुंड प्रवृत्तीचे लोक कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन आपली मुजोरी दाखवतात. आता अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी महावितरण पूर्णपणे सज्ज झाले असून, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हा कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे. या कठोर भूमिकेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तर मार्गी लागेलच, पण त्याचबरोबर प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित सेवा पुरवण्याच्या महावितरणच्या ध्येयालाही बळकटी मिळणार आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर















