

नागपूर, दि. 7 मार्च 2026: थकीत वीजबिलाची वसुली टाळण्यासाठी किंवा वेळ मारून नेण्यासाठी जाणीवपूर्वक न वटणारे (बाऊन्स होणारे) धनादेश देणाऱ्या वीज ग्राहकांसाठी आता महावितरणने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. नागपूर परिमंडलात फेब्रुवारी महिन्यात तब्बल 1 कोटी 93 लाख 38 हजार 477 रुपयांचे 1 हजार 297 धनादेश तांत्रिक किंवा आर्थिक कारणांमुळे अनादरीत (बाऊन्स) झाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या प्रकारामुळे वीज बिलांची वसुली रखडून थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने, महावितरण प्रशासनाने आता अशा ग्राहकांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता केवळ प्रशासकीय दंडच नव्हे, तर कायद्याचा कडक बडगा ग्राहकांना सोसावा लागणार आहे.
महावितरणने या गंभीर प्रकरणांची दखल घेत ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881’ (Negotiable Instruments Act, 1881) च्या कलम 138 अन्वये कायदेशीर कारवाईची मालिका सुरू केली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार, कोणत्याही बँक खात्यातून जारी केलेला धनादेश अपुऱ्या निधीअभावी किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे न वटल्यास, महावितरणकडून संबंधित ग्राहकाला 30 दिवसांच्या आत रितसर नोटीस बजावण्यात येईल. या नोटीसची मुदत संपल्यानंतरही 15 दिवसांच्या आत जर संबंधित ग्राहकाने रकमेचा भरणा केला नाही, तर 30 दिवसांच्या आत त्या ग्राहकाविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या कायद्यानुसार दोषी ठरल्यास ग्राहकास दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंडाची, अथवा दोन्ही शिक्षा होण्याचे कायदेशीर प्रावधान आहे.
या कठोर कायदेशीर प्रक्रियेसोबतच महावितरणने आपल्या अंतर्गत नियमावलीतही कडक बदल केले आहेत. ज्या ग्राहकांचे धनादेश बाऊन्स होतील, त्यांची पुढील सहा महिन्यांसाठी धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा पूर्णपणे निलंबित केली जाणार आहे. याशिवाय, प्रत्येक वीज बिलासाठी विलंब शुल्क आणि जीएसटीसह 885 रुपयांचा दंड थेट पुढील बिलात ‘इतर आकार’ या सदराखाली समाविष्ट केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, जर एकाच धनादेशाद्वारे अनेक बिलांची रक्कम भरली गेली असेल, तर प्रत्येक बिलासाठी स्वतंत्र दंडाची आकारणी केली जाणार आहे, ज्याचा मोठा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागू शकतो.
सद्यस्थितीत अनेक ग्राहकांकडून चुकीची तारीख टाकणे, स्वाक्षरीमध्ये तफावत असणे, खाडाखोड करणे किंवा बँक खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही धनादेश देणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या सर्व त्रुटी आता महावितरणच्या रडारवर आल्या आहेत. महावितरणने सर्व वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की, धनादेश देताना तारीख, अचूक रक्कम, स्पष्ट स्वाक्षरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची ग्राहकांनी पूर्ण खात्री करावी. महावितरणच्या या कठोर धोरणामुळे आता केवळ थकीत वसुलीच वेळेवर होणार नाही, तर वीज ग्राहकांमध्ये आर्थिक शिस्तही पाळली जाईल. त्यामुळे आता वीज ग्राहकांनी अधिक सावध राहणे आणि बिलाचा भरणा वेळेवर व अचूक पद्धतीने करणे, हेच त्यांच्या हिताचे ठरणार आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















