
लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने देश राममय!
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 8 |
एकवेळ मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, या मानसिकतेचे पंडीत जवाहरलाल नेहरू होते. त्यांचे पणतू राहुल गांधी आज निवडणूक प्रचारादरम्यान विविध मंदिरात जाऊन आपण हिंदू असल्याची वारंवार ग्वाही देतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर स्वतःचे गोत्र सांगून जानवे घालून फिरण्याची वेळ आली आहे. हिंदुत्वाला दूषणे देत असताना आपण हिंदू आहोत, याची कबुली राहुल गांधींना द्यावी लागते आहे. ज्या गंगामाता यात्रेला सत्ताधारी काँग्रेसने विरोध केला, ठीकठिकाणी अडवणुकीचा प्रयत्न केला, अडथळे आणले त्याच गंगेचे जल प्राशन करून त्याचे फोटो व्हायरल करण्याची वेळ प्रियंका गांधींवर आली. याचाच अर्थ असा की वर्तमानात या देशात हिंदूंचे हित दावावर लावून आजवर केलेले राजकारण चालणार नाही, याची संपूर्ण खात्री काँग्रेसला आलेली आहे. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्याला क्रमाक्रमाने देशात बदललेले वातावरण यासाठी कारणीभूत आहे.
आजवर राबवलेल्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचे बुरखे टराटरा फाडले गेले आहेत. नेहरूंच्या काळापासून राबवलेल्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचे विक्राळ रूप जनतेसमोर उघड करण्याचे खरे श्रेय जाते ते लालकृष्ण अडवाणी यांना. 1989 च्या भाजपाच्या पालमपूर अधिवेशनात भाजपाने श्रीरामजन्मभूमी मुक्त करून त्यावर मंदिर बांधण्याचा ठराव पारित केला. श्रीरामजन्मभूमीच्या बाजूने पर्यायाने हिंदूंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस तेव्हा फक्त भाजपाने दाखवले. लालकृष्ण अडवाणी यांनी सांस्कृतिक राष्ट्रावादाची देशपातळीवर चर्चा घडवून आणली. बेगडी धर्मनिरपेक्षतेवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. तेव्हाही या देशातील कथित पुरोगामी, बुद्धिजीवी, डावे, माओवादी, समाजवादी आणि छद्म धर्मनिरपेक्षतावादी एकत्र येऊन मंदिराच्या विरोधात अल्पसंख्यांकांचे ‘मसीहा’ बनू पाहत होते. त्यांच्यात लांगुलचालनाची होड लागली होती. अडवणीजी मात्र, तर्क, पुरावे, अनुभव, घटनाक्रम याच्या तपशिलांसह शास्त्रशुद्ध मांडणी करत होते. देशभर बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात क्रमाक्रमाने जनमानस तयार होत होते.
1990 साली 25 सप्टेंबर या एकात्म मानव दर्शन प्रणेते पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंती दिनापासून लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेला प्रारंभ केला. 30 ऑक्टोबर 1990 या कारसेवेच्या दिनी ही रथयात्रा अयोध्येत पोहचणार होती. रथयात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले. मार्गात लक्षावधी लोक यात्रेचे स्वागत करत होते. यात्रा जाईल तो प्रदेश राममय होत होता. या यात्रेने श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे चित्रच बदलवले. बेगडी धर्मनिरपेक्षतेचे सारे ‘मसीहा’ हादरले. विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान होते. त्यांच्या सरकारला भाजपाचे समर्थन होते. अडवाणींची रथयात्रा कसेही करून थांबवली जावी, यासाठी विश्वनाथ प्रताप सिंहांचे देखील प्रयत्न सुरू होते. त्यांनाही अल्पसंख्यांकांचे ‘मसीहा’ ठरायचे होते. व्ही. पी. सिंह यांनी श्रीरामजन्मभूमीची वादग्रस्त जागा अधिग्रहित करून ती श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे सोपवण्याचा करार व्ही. पी. सिंह यांनी अडवाणीजींसोबत केला होता, असे सांगितले जाते. मात्र, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव मानायला तयार नव्हते. अडवाणी यांची रथयात्रा अडवण्याचा मुलायमसिंहांचा मनसुबा जाहीर होता. व्ही. पी. सिंह आणि लालूप्रसाद यादव यांनी संगनमताने लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहार मध्येच अडवली. लालकृष्ण अडवाणी यांना 23 ऑक्टोबर 1990 रोजी बिहारच्या समस्तीपुर येथे अटक करण्यात आली. *तो पर्यंत या रथयात्रेने आठ राज्यातून नऊ हजार किलोमीटर प्रवास पूर्ण केला होता.* अडवाणींच्या रथयात्रेला रोखल्याने बाबरी ऍक्शन कमिटीची मागणी पूर्ण झाली.
झाले उलटेच. रथयात्रा पूर्ण झाली असती तर जेवढी परिणामकारक ठरली नसती त्याहीपेक्षा अडवाणींची अटक परिणामकारक ठरली. देद्यभर संतापाची लाट उसळली. सर्वसामान्य माणूस श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय झाला. *या रथयात्रेला अडवल्याने व्ही पी सिंहांचे सरकार कोसळले. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे 1990 पासून उत्तर प्रदेशातील काँग्रेसची पाळंमुळं खणली गेली.*
अडवाणीजींच्या रथयात्रेने काही मापदंड निश्चित केले. गठ्ठा मतपेटीसाठी होणाऱ्या लांगुलचालनाच्या विरोधात भारतीय जनमानस एकवटले. बहुसंख्य हिंदुंना फाट्यावर मारून राजकारण होणार नाही, याची मुहूर्तमेढ या रथयात्रेने केली. *नेहरूंपासून ‘राम’ अव्हेरला गेला. मात्र, त्यांच्या पणतूंना ‘राम राम’ करणे भाग पडले आहे.*
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717927
*( प्रतिदिन अखबार लेखमाला )*