
अपघात आणि चोरीला बसणार चाप.
नागपूर (Nagpur), दि. 16 एप्रिल 2026: सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महावितरणने आता एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. नागपूर परिमंडळातील सार्वजनिक वर्दळीच्या आणि अपघातप्रवण भागातील वीज वितरण रोहित्रांच्या (DTC) सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी आता ‘फाइबर रिइंफोर्स्ड पॉलीइथिलीन’ (FRP) या उच्च दर्जाच्या, टिकाऊ आणि शॉकप्रूफ साहित्याचे विशेष कुंपण बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमामुळे विजेच्या अपघातांना पूर्णविराम मिळणार असून, वीज चोरीच्या घटनांवरही प्रभावी नियंत्रण मिळवणे आता शक्य होणार आहे.

अनेकदा वीज वितरण रोहित्रांचे दरवाजे उघडे राहिल्याने किंवा ते गंजून तुटलेल्या स्थितीत असल्याने नागरिक, विशेषतः खेळणारी लहान मुले आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ही संभाव्य जोखीम ओळखून महावितरणने आता संपूर्ण वितरण पेटीच बंदिस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे ‘एफआरपी’ कोटिंग केवळ सुरक्षितच नाही, तर ते पावसाळा, कडक ऊन किंवा हिवाळा अशा सर्व प्रकारच्या हवामानातील टोकाच्या बदलांना तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. यामुळे कोणत्याही ऋतूत यंत्रणा सुरक्षित राहील. तसेच, हे साहित्य चोरीला प्रतिबंध करणारे (Theft Proof) असल्याने वीज उपकरणांची अनधिकृत छेडछाड थांबणार असून, तांत्रिक बिघाडामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे ग्राहकांना अखंडित वीज सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे सार्वजनिक आरोग्य, परिसर स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा. अनेक ठिकाणी उघड्या वितरण केंद्रांच्या मोकळ्या जागेत नागरिक कचरा टाकतात, ज्यामुळे तेथे तांत्रिक काम करणे कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचे आणि जीवघेणे ठरते. या कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीचा त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागतोच, शिवाय जर कोणी हा कचरा पेटविला तर त्याची झळ थेट वीज यंत्रणेला पोहोचून मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा आग लागून भीषण अपघात घडू शकतात. नवीन बंदिस्त स्वरूपामुळे रोहित्रांच्या परिसरात कचरा टाकण्यास अटकाव होईल, परिणामी संपूर्ण परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि देखणा राहण्यास मोठी मदत होईल.

या संरचनेवर महावितरणने पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्राचा ‘वितरण रोहीत्र क्रमांक’, संबंधित क्षेत्रातील जबाबदार ‘जनमित्राचे नाव’, त्यांचा ‘मोबाईल क्रमांक’ आणि त्या रोहित्रावरील ‘वीज वितरण हानी’ (DTC Loss) यांसारखी महत्त्वाची माहिती देणारे फलकही लावण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा तांत्रिक तक्रार असल्यास सामान्य नागरिकांना महावितरणच्या यंत्रणेशी थेट आणि तातडीने संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.

येत्या 24 महिन्यांच्या कालावधीत या संपूर्ण प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील 900 आणि वर्धा जिल्ह्यातील 100 रोहित्रांना हे आधुनिक सुरक्षा कुंपण बसविण्यात येणार असून, या कामाला प्रशासकीय पातळीवर मोठी गती देण्यात आली आहे. तांत्रिक सुधारणेसोबतच सामाजिक सुरक्षितता आणि स्वच्छतेचा मोठा संदेश देणाऱ्या महावितरणच्या या सकारात्मक बदलाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. ग्राहकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि लोकाभिमुख सेवा देणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असून, नागरिकांनीही या नवीन यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
















