Home Top News थकबाकीदारांवर महावितरणचा दणका; नागपूर परिमंडलात 21 हजारांवर वीज जोडण्या खंडित, वसुली मोहिमेला...

थकबाकीदारांवर महावितरणचा दणका; नागपूर परिमंडलात 21 हजारांवर वीज जोडण्या खंडित, वसुली मोहिमेला वेग

0

नागपूर, दि. 18 मार्च 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडलात थकीत वीज देयकांच्या वसुलीसाठी प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून, वारंवार सूचना देऊनही देयके न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध थेट कारवाई सुरू केली आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेत १६ मार्चपर्यंत परिमंडलातील २१ हजार ३०८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. मोहिमेला गती देण्यासाठी आता मुख्य अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात उतरले असून, त्यांनी प्रत्यक्ष कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर परिमंडलांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात एकूण १९ लाख ४६ हजार ५४३ लघुदाब वीज ग्राहक आहेत. यापैकी वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या २१ हजार ३०८ ग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे. वसुली मोहिमेची तीव्रता तपासण्यासाठी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी सिव्हिल लाईन्स विभागांतर्गत लष्करीबाग उपविभागातील कमल चौक परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकीची यादी तातडीने संपुष्टात आणण्याचे कडक निर्देश त्यांनी यावेळी दिले. महावितरणच्या या कारवाईचा धसका घेत १३ हजार ६४४ ग्राहकांनी आपली थकबाकी भरून वीज जोडणी पूर्ववत करून घेतली आहे.

ग्राहकांनी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, कारण वीजपुरवठा खंडित झाल्यास केवळ अंधाराचाच सामना करावा लागत नाही, तर त्याचे गंभीर आर्थिक परिणामही भोगावे लागतात. एकदा वीज खंडित झाली की, ग्राहकाला मूळ थकबाकीसह विलंब शुल्क, व्याज आणि पुनर्जोडणी शुल्क (Reconnection Charges) भरावे लागते. यामुळे देयकाचा बोजा अनावश्यकरीत्या वाढतो. ऐन उन्हाळ्यात वीज नसल्याने होणारा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी त्वरित देयके भरणे हाच एकमेव पर्याय आहे.

विशेष म्हणजे, मार्च महिना संपायला आता काही दिवसच शिल्लक असून आर्थिक वर्षअखेरीस बँकांना सलग सुट्ट्या आहेत. सुट्ट्यांमुळे देयके भरण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा विलंब होऊ शकतो. शेवटच्या दिवसाची वाट पाहिल्यास गर्दीमुळे देयक थकण्याची शक्यता असते, ज्याचा परिणाम थेट ‘कनेक्शन कट’ होण्यात होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी ‘लास्ट डेट’ची वाट न पाहता महावितरणचे मोबाईल ॲप किंवा अधिकृत केंद्रांवरून आजच आपल्या देयकाचा निपटारा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ: सिव्हिल लाईन्स विभागांतर्गत लष्करीबाग परिसरात सुरू असलेल्या वसुली मोहिमेचा आढावा घेताना नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि अधीक्षक अभियंता अमित परांजपे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर