Home Artical Blog रामनवमी उत्सवाच्या तयारीसाठी महावितरण सज्ज: शनिवारी गणेशपेठ परिसरातील वीज पुरवठा चार तास...

रामनवमी उत्सवाच्या तयारीसाठी महावितरण सज्ज: शनिवारी गणेशपेठ परिसरातील वीज पुरवठा चार तास राहणार बंद

0

नागपूर(Nagpur), 5 मार्च 2026: आगामी रामनवमीनिमित्त पोद्दारेश्वर राम मंदिर समितीद्वारे आयोजित भव्य मिरवणूक भाविकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी महावितरणने आतापासूनच सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मिरवणुकीच्या मार्गावरील विद्युत यंत्रणेची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या मध्यवर्ती बस स्थानक चौक ते मॉडेल मिल चौकापर्यंत भूमिगत केबल टाकण्याच्या अत्यावश्यक कामांसाठी, येत्या शनिवारी, 7 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत गणेशपेठ परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

या काळात 11 केव्ही गणेशपेठ वीज वाहिनीचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या महत्त्वाच्या कामामुळे जाधव चौक, गणेशपेठ ईएसआयसी, राहुल रेसिडेन्सी, गणेशपेठ गाडीखाना, कर्नलबाग, रामाजी वाडी, मॉडेल मिल चौक, राम कुलर चौक, नवी शुक्रवारी, मटण मार्केट, शिर्के रोड, जोग गल्ली, भुतिया दरवाजा आणि दसरा रोड या परिसरातील वीज पुरवठा खंडित राहील.

मिरवणुकीच्या मार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त केली असून, या महत्त्वाच्या सार्वजनिक कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील नागरिकांनी या चार तासांच्या वीज कपातीची नोंद घेऊन आपली कामे वेळेत उरकून घ्यावीत, असे प्रमहावितरणकडून कळविण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर