
अचूक बिलिंगमुळे ग्राहकांचा मनस्ताप होणार दूर
नागपूर, 12 फेब्रुवारी 2026: वीज वितरण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात असलेली भीती आणि गैरसमज दूर करून त्यांना या नवीन प्रणालीचे महत्त्व पटवून देण्यासाठी नागपूर परिमंडलात ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या विशेष मोहिमेचा औपचारिक शुभारंभ नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे आणि त्याबाबतची वस्तुस्थिती मांडणाऱ्या ‘फॅक्ट चेक’ पॅम्पेलेट्स, आकर्षक बॅनर्स, पोस्टर्स आणि भित्तीपत्रकांचे विमोचन करण्यात आले.
या मोहिमेची माहिती देताना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर हे केवळ एक नवीन उपकरण नसून ती वीज बिलिंग यंत्रणेतील एक मोठी क्रांती आहे. सध्याच्या पारंपारिक मीटरमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे अनेकदा रीडिंग घेताना चुका होतात, ज्यामुळे ग्राहकांना सरासरी किंवा चुकीची वीजबिले मिळतात. ही बिले दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. मात्र, स्मार्ट मीटरमुळे रीडिंगची प्रक्रिया पूर्णतः स्वयंचलित आणि अचूक होणार आहे. मानवी हस्तक्षेपाची गरज उरणार नसल्याने बिलिंगच्या तक्रारींना आता पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्मार्ट मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना आता आपल्या वीज वापराचे स्वयंचलित आणि पारदर्शक लेखाजोखा मिळणार आहे. जेवढा वीज वापर, तेवढेच बिल हे सूत्र आता प्रत्यक्षात येईल. विशेष म्हणजे, ग्राहकांना त्यांचा तासाभराचा वीज वापर मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. यामुळे कोणत्या उपकरणांमुळे जास्त वीज वापरली जात आहे, हे समजणे सोपे होईल आणि ग्राहकांना स्वतःहून आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. महावितरणने सध्या जुने, सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम अत्यंत वेगाने आणि सुरळीतपणे पार पाडले जात आहे.
या जनजागृती कार्यक्रमाला महावितरणच्या तांत्रिक, लेखा आणि मानव संसाधन विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोन्टे कार्लो कंपनीचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पंधरवड्यादरम्यान विविध माध्यमांतून स्मार्ट मीटरची सत्यता ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ‘अचूक बिलिंग आणि वीज बचतीसाठी स्मार्ट मीटर’ हा संदेश घेऊन महावितरण आता घराघरांत पोहोचत असून, या आधुनिक बदलाचा स्वीकार करून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतफे करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटर पंधरवड्यानिमित्त फॅक्ट चेक साहित्याचे विमोचन करताना मुख्य अभियंता दिलीप दोडके व अन्य अधिकारी.














