
ग्राहकांना मिळणार दर्जेदार वीजपुरवठा – सचिन तालेवार
नागपूर, दि. 12 फेब्रुवारी 2026: राज्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि ग्राहकभिमुख करण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाचे एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टम’ (SMS) या नव्या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील वीज उपकेंद्रांवर आता चोवीस तास ‘डिजिटल डोळा’ ठेवला जाणार आहे. या प्रणालीमुळे वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड शोधणे आणि ते युद्धपातळीवर दुरुस्त करणे अधिक सुलभ होणार असून, ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास महावितरणचे संचालक (संचलन/प्रकल्प) सचिन तालेवार यांनी व्यक्त केला.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित ‘ए. बी. कोट्टेवार स्मृती व्याख्यान २०२६’ मध्ये ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. “चांगल्या नेटवर्क दृश्यमानतेद्वारे डिस्कॉम कार्यक्षमता अनलॉक करणे: सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टम (Unlocking Discoms Efficiency through Better Network Visibility: Substation Monitoring System) ” या विषयावर तालेवार यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. ही संपूर्ण प्रणाली ‘स्वदेशी’ बनावटीची असून ती अत्यंत कमी खर्चात विकसित करण्यात आली आहे, हे या तंत्रज्ञानाचे विशेष वैशिष्ट्य आहे. या ऑटोमेशन प्रणालीमुळे मुख्य नियंत्रण कक्षात बसूनच राज्यातील विविध उपकेंद्रांमधील वीज प्रवाह, व्होल्टेज आणि उपकरणांची सद्यस्थिती ‘रिअल-टाइम’ म्हणजेच थेट पाहता येणार आहे.
या तंत्रज्ञानाचे थेट फायदे विषद करताना तालेवार म्हणाले की, अनेकदा वीज पुरवठा खंडित झाल्यावर बिघाड नेमका कुठे झाला आहे हे शोधण्यात मोठा वेळ जातो. मात्र, या प्रणालीमुळे देखभाल पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बिघाडाचे अचूक ठिकाण नियंत्रण कक्षाला समजेल. परिणामी, दुरुस्तीचा वेळ कमी होऊन वीज पुरवठा लवकर पूर्ववत होईल. विशेष म्हणजे, एखाद्या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित भागातील ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर त्वरित एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. याशिवाय, व्होल्टेजमधील चढ-उतार नियंत्रित राहणार असल्याने ग्राहकांच्या घरातील महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे होणारे नुकसानही टळणार आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यातील सुमारे 2,733 कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण केले जात आहे. या नवीन मॉनिटरिंग सिस्टीमच्या मदतीने शेतकऱ्यांना दिवसा सलग 8 तास शाश्वत आणि भरवशाचा वीजपुरवठा मिळणे अधिक सुलभ होणार आहे. महावितरणने आजवर 9.8 लाख रोहित्रे आणि 11.8 लाख किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांचे अवाढव्य जाळे विणले आहे. आता केवळ हे जाळे विस्तारण्यापेक्षा डेटा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक ‘स्मार्ट ग्रीड’ तयार करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘डिजिटल ट्विन्स’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून वीज वितरण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. केवळ मजबूत ग्रीड असण्यापेक्षा ‘स्मार्ट ग्रीड’ हे नेहमीच सरस ठरते, कारण ते संभाव्य धोके आधीच ओळखू शकते. या डिजिटलायझेशनमुळे राज्यातील 3 कोटींहून अधिक ग्राहकांना अधिक विश्वासार्ह आणि वेगवान सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही तालेवार यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संदीप शिरखेडकर, संयोजक रमेश अकुलवार, मानद सचिव जयंत जोशी, महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, ए. बी. कोट्टेवार यांचे कुटुंबिय, निवृत्त कार्यकारी संचालक प्रकाश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदिप चामट यांच्यासह वीज क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सतफे करण्यात आलेला सत्कार स्विकारतांना महावितरणचे संचालक (संचलन/प्रकल्प) सचिन तालेवार














