Home NAGPUR NEWS १३ व १४ फेब्रुवारी रोजी ‘विराट हिंदू संमेलन’चे आयोजन

१३ व १४ फेब्रुवारी रोजी ‘विराट हिंदू संमेलन’चे आयोजन

0

राष्ट्रीय चिंतक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची विशेष उपस्थिती

नागपूर (Nagpur) :-

राष्ट्रहित सर्वोपरी मानून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. सन २०२६ मध्ये संघशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा उत्सव संपूर्ण समाजाच्या सहभागातून साजरा करण्यात येत आहे. संघटित व सज्जन शक्ती राष्ट्राच्या कल्याणासाठी सक्रिय राहावी, या उद्देशाने देशभरात ‘विराट हिंदू संमेलन’सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

व्यक्ती निर्माण, सक्षम व्यवस्था उभारणी आणि समाज परिवर्तन या त्रिसूत्रीच्या आधारावर संघाने गेल्या शंभर वर्षांपासून आपले कार्य राष्ट्रहितासाठी समर्पित केले आहे. संघशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, ‘स्व’चा बोध तसेच नागरिक कर्तव्यांचे पालन — या पाच परिवर्तनकारी मुद्द्यांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य या संमेलनांच्या माध्यमातून केले जात आहे.

याच उद्देशाने सकल हिंदू समाज आणि रामदासपेठ नागरिक मंडळ यांच्या वतीने दि. १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रामदासपेठ येथील लेंड्रा पार्क मैदानावर भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी, शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘भजन जॅमिंग’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यात पारंपरिक व आधुनिक संगीताचा अनोखा संगम सादर केला जाईल. सुप्रसिद्ध कलाकार पियूष व रक्षंदा यांच्या विशेष सादरीकरणामुळे कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

दुसऱ्या दिवशी, शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध राष्ट्रीय चिंतक व ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते ‘राष्ट्रभक्ती आणि संघटन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी निवृत्त नौदल अधिकारी शेखर केळकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या व भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका प्रो. डॉ. लीना गहाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून “निर्मल पावन भावना, सर्वांच्या सुखाची कामना, गौरवमय समरस जनजीवन — हीच राष्ट्र आराधना” हा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. संघटित हिंदू समाजच देशाला विश्वगुरू बनविण्याच्या दिशेने निर्णायक भूमिका बजावू शकतो, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

हे संमेलन रामदासपेठ नागरिक मंडळाच्या संरक्षणाखाली आयोजित करण्यात येत असून आयोजन समिती निखिल कुसुमगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. समितीचे उपाध्यक्ष मुकेश अग्रवाल व शिल्पा रावल, कोषाध्यक्ष दिपक हेडा आणि सचिव डॉ. संजय मराठे आहेत.
या ‘विराट हिंदू संमेलनात’ नागपूर शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. निखिल कुसुमगर, शिल्पा रावल, प्रमोद पटवर्धन, मुकेश अग्रवाल, अशोक पत्की, नगरसेवक विनय दाणी, दीपक हेडा, स्वानंद सोनी, हर्षल भिशीकर यांची उपस्थिती होती.