
चंद्रपूर (Chandrapur):- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चंद्रपूर येथून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा क्षेत्रापर्यंत तीन दिवसीय पददिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पददिंडी दि. १२ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडणार असून सर्व भक्तगणांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हभप श्रीमती नीता प्रभाकरराव पुल्लीवार माऊली व चैताली पुल्लीवार खटी यांच्या पुढाकारातून २०१४ पासून या पददिंडीची सुरुवात करण्यात आली. पंढरपूरप्रमाणेच मार्कंडा क्षेत्राची धार्मिक महती जनमानसात पोहोचावी व देव, देश, धर्म जागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून दिंडीची परंपरा अधिक बळकट होत आहे.
दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता श्री महाकाली माता मंदिर, चंद्रपूर येथून पालखी पूजन व आरतीनंतर पददिंडीस प्रारंभ होईल. दुपारी बंगाली कॅम्प रोड, कृष्णनगर हनुमान मंदिर येथे महाप्रसादानंतर दिंडी मूलकडे प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी मूल येथून दिंडी चांदा हेटी मार्गे हरणघाट येथे मुक्कामी राहील. दि. १४ फेब्रुवारी रोजी मार्कंडा येथे श्री महादेवाचे दर्शन घेऊन दिंडीची सांगता होईल.
या तीन दिवसीय शिवरात्री पददिंडीत तन, मन, धनाने सहभागी होण्याचे तसेच काही कारणास्तव प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकणाऱ्या भक्तांनी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सेवाभावाने सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.














