Home Breaking news महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’, ताळेबंद सुधारण्यावर भर

महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’, ताळेबंद सुधारण्यावर भर

0

कामात कुचराई करणाऱ्यांना कारवाईचा इशारा

नागपूर, दि. 3 फेब्रुवारी 2026: महावितरणची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आणि लेखापरीक्षणातील (Statutory Audit) त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन आता आक्रमक झाले आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत कार्यकारी संचालक (वित्त व लेखा) श्रीमती स्वाती व्यवहारे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना कामाचा वेग वाढवण्याचे कडक निर्देश दिले असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती परिमंडळातील मुख्य अभियंता आणि वरिष्ठ वित्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत ‘शून्य त्रुटी’ (Zero Qualification) मिशनवर भर देण्यात आला. प्रलंबित असलेल्या जुन्या साहित्याचा (Stock) हिशोब पूर्ण करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. विशेषतः 3 वर्षांहून अधिक काळ पडून असलेल्या साहित्याचा वापर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी सर्व कार्यालयांनी आपल्याकडील संचलन व सुव्यवस्था (O&M) साठ्याची माहिती गुगल स्प्रेडशीटवर अपडेट करणे अनिवार्य आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत साठ्याची सर्व नोंदणी सॅप (SAP) प्रणालीत करणे आवश्यक आहे. याचसोबत 2020-21 पासून तयार झालेल्या मालमत्तांची आणि मिळालेल्या अनुदानाची अचूक माहिती 8 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्राहकांच्या सुरक्षा ठेव (SD) नोंदी अद्ययावत करणे आणि इमारती, फर्निचर, आयटी उपकरणांची भौतिक पडताळणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.

कार्यकारी संचालक श्रीमती स्वाती व्यवहारे यांनी महावितरणच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत असताना स्पष्ट केले की, विभागीय स्तरावर नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालणे गरजेचे आहे. कामात पारदर्शकता आणण्यासाठी ‘रिअल टाइम’ स्टॉक बुकिंग आणि प्रलंबित देयकांचा निपटारा करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीला मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, हरिष गजबे, अशोक साळुंके, राजेश नाईक, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, उप महाव्यवस्थापक सरिता ठाकूर, उप महाव्यवस्थापक चैताली पांडव, वरिष्ठ व्यवस्थापक आरती कानडे यांच्यासह सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंते लेखा विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व उपव्यवस्थापक उपस्थित होते.

आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना श्रीमती स्वाती व्यवहारे सोबत सुहास रंगारी, दिलीप दोडके, हरिष गजबे, अशोक साळुंके, राजेश नाईक, व अतुल राऊत.